MNS on Shivsena Dasara Melava: शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीचे सावट यंदाच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू लागले आहे. शिवसेनेकडून (Shivsena) शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागण्यात आली आहे. तर, शिंदे गटाकडूनही (Shinde Group) दसरा मेळावा हायजॅक करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) या वादावर भाष्य केले आहे. वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो, हे दोन्ही गटांनी लक्षात घ्यावं असा टोला मनसेने लगावला आहे. 


शिवसेना आणि दसरा मेळावा हे अतूट नातं आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या परंपरेची सुरुवात केली होती.
 बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात. या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. शिवसेनेची राजकीय भूमिका या दसरा मेळाव्यातून अधिक स्पष्ट होते. त्याशिवाय भविष्यातील वाटचालीबाबतही भाष्य केले जाते.


शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून आम्ही खरी शिवसेना असा दावा करण्यात येत आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे गटाने आपली कार्यकारणी जाहीर केली असून निवडणूक आयोगाकडे धाव घेत पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. आता, शिंदे गटाने आता दसरा मेळाव्याकडे आपले लक्ष वळवल्याची चर्चा सुरू आहे. 


मनसेचा टोला


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या दसरा मेळाव्याच्या मुद्यावर भाष्य केले आहे. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेना आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. 'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे. आजच्या घडीला  दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे  "वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो" असे ट्वीट देशपांडे यांनी केले आहे. 


 






माझ्याकडे विचारांचा वारसा


काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित केले होते. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि शिंदे गटावर टीका केली होती. माझ्याकडे काहीही नसले तरी विचार आहेत. वारसा हा वास्तूंचा नसतो तर विचारांचा असतो असे सांगत बाळासाहेबांचे विचार आपल्यासोबत असल्याचे राज यांनी सांगितले होते.