एक रांग.. अडचणीची!
ही गोष्ट आहे मुंबईची.. मायानगरीची.. जिथं लोक गगनचुंबी स्वप्नं पाहतात. पण याच मुंबईचं आणखी एक वास्तव आहे. रांगेचं. शौचालयासाठीच्या रांगेचं.
मानखुर्द.. मुंबईचं प्रवेशद्वार. इथं महाराष्ट्रनगर, भीमनगरची झोप़डपट्टी आहे. लोकसंख्या लाखांच्या घरात आहे. पण शौचालय एकच. त्यामुळे सकाळी सहापासून लोक इथं रांगेत असतात. अंगावर काटा आणणाऱ्या यांच्या कथा आम्ही जाणून घेतल्या.
पहाटे सहापासूनच इथे रांग लावायला सुरुवात होते. कुणी नुसताच आपला नंबर लावून आपली शौचाला जायची वेळ येईपर्यंत आणखी दोन-तीन कामं आटपून येतो. कुणी अपल्याजागी बदली म्हणून लहान मुलांनाही नंबरसाठी उभं करुन जातो. अशारितीनं इथे सकाळी सहाला नंबर लावला असेल तर तुम्हांला साधारण नऊपर्यंत मोकळं होता येतं.
काहींनी सांगितलं, लहान मुलांना कळत नाही, पण लोक त्यांनाही रांग तोडू देत नाहीत.
आता ही लहानसहान पोरांची ही कथा तर तिकडं महिलांची अवस्था आणखीच कठीण. घरची कामं करा, पोरांचं आवरा आणि या रांगेसाठी 4 तास राखीव ठेवा. आणि हे सगळं सांभाळून नोकरीही करा.
सोमवार ते शुक्रवार इथं बरी अवस्था असते, कारण बहुतेक जण कामाच्या ठिकाणीच मोकळे होतात. पण रविवार आला की अर्धी सुट्टी शौचालयाच्या रांगेत जाते.
अडचणी आहेत, म्हणून निसर्ग थांबत नाही. मासिक पाळीच्या दिवसात तर बायकांना नर्क बरा असं वाटतं. स्वच्छ भारताची घोषणा करुन मोदींनी कारभार उरकला. उघड्यावर बसणं गुन्हा आहे. पण मोकळं होण्यासाठी पुरेशी शौचालयं तरी कुठे आहेत?
कुठे किती शौचालयं
सकाळच्या वेळेत प्रत्येकी पाच मिनिटं शौचालय वापरलं तरी सरासरी 194 लोकांसाठी 4 तास 4 मिनिटं वेळ लागतो. मानखुर्द -गोवंडी भागांत शौचालये आणि त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या यांचं प्रमाण व्यस्त आहे.
अण्णाभाऊ साठे नगरमध्ये 24 हजार लोकसंख्येसाठी अवघी 79 शौचालये आहेत. म्हणजे प्रत्येक शौचालयासाठी 293 वापरकर्ते.
गोवंडीमध्ये 69 हजार 880 लोकसंख्येसाठी अवघी 350 शौचालये आहेत. म्हणजे एका शौचालयात 184 जणांचा विधी करावा लागतो.
तर रफीकनगर भागात 15 हजार 775 लोकसंख्या आहे, आणि प्रत्येक शौचालयात 194 जण जातात.
स्मार्ट सिटी, स्वच्छ भारतच्या घोषणा आकर्षक आहेत. मुंबई तर कधीच शौचमुक्त झालीय. स्वच्छ भारतातही मुंबापुरीचा नंबर वरचा आहे. कागदावर देश प्रगत आहे, ज्याचं वास्तव माझाच्या कॅमेऱ्यात आहे. राज्यकर्त्यांवर दोन ओळी खर्च करुन काही होणार नाही, त्यामुळे इथंच थांबणं शहाणपणाचं ठरेल.
संबंधित बातम्या
स्पेशल रिपोर्ट : मुंबई : स्वच्छ आणि हागणदारी मुक्त मुंबईचा रिअॅलिटी चेक
स्पेशल रिपोर्ट : यवतमाळ : खाऊच्या पैशातून दोन बहिणींनी उभारलं शौचालय