मुंबई : तरुणाने बहिण आणि मेहुण्यावर गोळ्या झाडल्याची घटना मुंबईच्या कांदिवलीतील समतानगर इथे सोमवारी (16 डिसेंबर) घडली. यानंतर तरुणाने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. बटेश्वर त्रिलोकीनाथ तिवारी (वय 32 वर्ष)असं तरुणाचं नाव आहे. बहिणीने आपल्याच परंतु दुसऱ्या जातीच्या मित्रासोबत प्रेमविवाह केल्याचा बटेश्वरच्या मनात होता. त्यामधूनच त्याने हे कृत्य केल्याचं समजतं. या घटनेत बहिण आणि तिचा पती सुखरुप बचावले आहेत.


बहिण वंदनाने (वय 20 वर्ष) सहा महिन्यांपूर्वी बटेश्वरचा मित्र रोहित सिंहसोबत (वय 27 वर्ष) प्रेमविवाह केला होता. परंतु रोहित सिंह दुसऱ्या जातीचा होता. त्यामुळे बहिणीने त्याच्याशी लग्न केलेलं बटेश्वर आणि त्याच्या कुटुंबीयांना रुचलं नाही. याचा राग मनात ठेवून बटेश्वर उत्तर प्रदेशातून काल (16 डिसेंबर) त्यांच्या घरी आला. तोंडाला कपडा बांधून तो घरात घुसला आणि त्यांच्याशी भांडण करत बॅगमधून आणलेल्या पिस्तुलातून मेहुणा रोहितवर गोळी झाडली.

परंतु वंदनाने प्रसंगावधान दाखवत रोहितला ढकलल्याने त्याचा जीव वाचला. त्यानंतर वंदनाने बटेश्वरला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावरही गोळी झाडली. गोळी वंदनाच्या गालाला खरचटून गेल्याने ती वाचली. दोघे पती-पत्नी घराबाहेर पळाल्यानंतर बटेश्वरने घराचा दरवाजा बंद करत स्वत:वर गोळी झाडत आयुष्य संपवलं.

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. तसंच या कृत्यासाठी वापरलेल्या शस्त्राचा परवाना बटेश्वरकडे होता की नाही याचा शोध पोलिस घेत आहेत. बटेश्वरच्या शरीरावरील जखमा पाहता गोळी त्याच्या पाठीतून घुसून छातीतून बाहेर आली आहे. याचा अर्थ त्याच्यावर गोळी झाडली आहे, असं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी मेहुणा रोहितला ताब्यात घेतलं आहे.