मुंबई : यू ट्यूबवर व्हिडीओ पाहून गॅस कटरच्या सहाय्याने बोरिवलीतील एटीएम मशीन लुटण्याचा प्रत्नन करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील समतानगर पोलिसांनी ही कारवाई केली. पुनीत राणा असं आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपीचा चोरीचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि तो फसला.


मुंबईच्या पूर्व उपगनरातील मुलुंडमध्ये गेल्या आठवड्यात गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. तसाच प्रकार आज (26 ऑक्टोबर) पश्चिम उपनगरातील बोरिवली पूर्व या ठिकाणी झाला. आरोपी पुनीत राणाने आज पहाटे गॅस कटर साहाय्याने इंडिकॅश हे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु याची माहिती एका व्यक्तीने समतानगर पोलिसांना दिली. त्यांनी लगेचच त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाऊ लागला, परंतु समतानगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय रासकर आणि सहकाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या.


एटीएम सेंटर फोडण्यासाठी गॅस कटरचा उपयोग करण्याची आयडिया आरोपीला यू ट्यूबवर व्हिडीओ पाहून आली. यासाठी त्याने कांदिवलीतून एलपीजी गॅस सिलेंडर, काळबादेवी इथून गॅस कटर आणि मालाडमधून ऑक्सिजन गॅस सिलेंडर विकत घेतले होते, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.


समतानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांच्या माहितीनुसार, "मुलुंड परिसरातही अशाच प्रकारच्या एटीएम चोरीची घटना घडली होती, ज्यात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अनेक भागात अशाप्रकारच्या घटना पूर्णत्वास नेण्यासाठी विविध ठिकाणी गॅस सिलेंडरच्या विक्रीची प्रकरणं समोर आली होती.