मुंबई : 'काल एका वाया गेलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलत होता', अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. नितेश राणे म्हणाले की, स्वतःच्या मुलाचे कर्तृत्व लपवण्यासाठी हे चाललं आहे.  हे म्हणजे महाराष्ट्र आणि आम्ही बाहेरून आलोय का? पोलिसांबद्दल आम्हाला पण आदर आहे. यांनी आम्हाला शिकवू नये, असंही नितेश राणे म्हणाले.


नितेश राणे म्हणाले की, बाळासाहेबांनी अंगणात तुळशी वृंदावनच लावले होते. पण यांचा श्रावणबाळ जिथे संध्याकाळी बसतो त्या डिनोच्या अंगणात तुळशी होती की गांज्याची शेती आहे ते तपासून पहा, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, सीबीआयला निःपक्षपातीने चौकशी का करू दिले जात नाहीये, काय झालं होतं दिशा सालियानच्या घरी, CDR रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज का समोर येऊ देत नाहीत? समित ठक्कर, साहिल चौधरी यांना अटक का केलं जातं आहे. हे घाबरतात म्हणून? असा सवाल देखील नितेश राणेंनी केला.


नितेश राणे म्हणाले की, आज मुख्यमंत्री आहात पण असलेले सर्व पुरावे तुम्ही नष्ट करू शकत नाही, आमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत. सीबीआय हत्या की आत्महत्याचे संकेत देण्याचे काम करत नाहीत. त्यांचा रिपोर्ट आला की सगळं स्पष्ट होईल, असं ते म्हणाले.



Shivsena Dussehra Melava : हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान


अजून कोरोनाचा लस आली नाही पण आमच्याकडे या सरकारविरोधातील टाचणी तयार आहे. तेल लावून ठेवलंय टाचणीला, वेळ आली की बरोबर जिथे लावायची तिथं लावणार, असा टोला त्यांनी लगावला.


काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे
मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल राणे पितापुत्रांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की,  शिवसेनेचा दसरा मेळावा कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही. पण काही जणांना इंजेक्शन देने गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला, त्यांनी बाबांना सांगितलं, असा टोला उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रांना लगावला होता. आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.