मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना एकीकडे लॉकडाऊन सुरु झालं असताना मंत्रालयातील मंत्र्यांची, आमदारांची संख्या मर्यादित होती. तरीही या काळात नियमित आणि वेळेत येणारे मंत्री म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार. संपूर्ण मंत्रालय ओसाड असताना सकाळी नऊ वाजताच मंत्रालयात येऊन काम सुरु करणारे अजित पवार कोरोना काळात मात्र विशेष काळजी घेऊ लागले. अजित पवार सगळ्यात जास्त काळजी घेत होते, मात्र आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.


बैठकांना गर्दी होऊ नये म्हणून अजित पवार यांचे कार्यालय विशेष काळजी घ्यायचे. त्यांच्या कार्यालयात मशीन आणि सॅनिटायझर वापरणे हे बंधनकारक होते. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी याकडे विशेष लक्ष ठेवून असायचे. अगदी कार्यालयात येणारे कागद, फाईल देखील सॅनिटाईज करायला विशेष मशीन लावण्यात आले होते.



अजित पवार हे एकमेव मंत्री मंत्रालयात उपलब्ध असल्याने तिथे पत्रकार गेले तर त्यांच्या माईकवर सॅनिटायझर शिंपडून मगच ते पत्रकारांच्या पश्नांना उत्तर द्यायचे. कोणी फोटो काढायला उभे राहिले तरी अंतर ठेवून फोटो अजित पवार यांनी काढले.



राष्ट्रवादी कार्यालयात देखील जनता दरबार सुरु झाल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवत अजित पवार लोकांसाठी कार्यालयात उपलब्ध असायचे. तरी मतदारसंघ, मेट्रोच्या कामाची पाहणी, अतिवृष्टी अशावेळी फिल्डवर मात्र पाहणी करायला गेल्यावर हे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नव्हतं. अजित पवार त्यावेळी मात्र लोकांमध्ये जात होते. शेवटचा दौरा त्यांनी केला तो सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागात. सोलापूरला बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर अजित पवार मात्र विलगीकरणात गेले.



त्यांना थकवा जाणवत होता, खोकला होता. त्यांनी पहिली चाचणी केली ती निगेटिव्ह आली तरी ते विलगीकरणात होते. त्यावरुनही चर्चा सुरु होत्या. अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.


अजित पवार यांनी आपल्या आजारपणाबद्दल देखील जास्त बोलणं, माहिती देणे टाळलं. त्यांना याबाबत सार्वजनिकरित्या चर्चा करणे आवडत नाही असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. अजित पवार यांचा धाक पण इतका मोठा की त्यांना नेमकं झालं काय हे सांगायला पण कोणी तयार नव्हते. अजित पवार यांच्याबाबत काहीही माहिती हवी तर त्यांच्या कार्यालयाला विचारा, अधिकृत माहिती तेच देतील अस सांगून सगळे शांत राहत होते.


आज सकाळी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केल्यावर मात्र उपमुख्यमंत्री कार्यालयाने अधिकृतरित्या अजित पवार यांना कोरोना लागण झाल्याची माहिती दिली. अजित पवार यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यावर दादांनी इतकी काळजी घेतली, त्यांच्याइतक कोणीच खबरदारी घेतली नाही, सतत काम करत होते. पण त्यांना कोरोनाने गाठलंच अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.