Mumbai Mahpalika : पिसे बंधाऱ्याची पाणी पातळी खालावल्याने 19 मार्च 2024 रोजीच्या पाणीपुरवठ्यात 15 टक्‍के कपात करण्यात असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांनी पाणी जपून वापरण्‍याचे आवाहन करण्यात आले आहे. 


पिसे येथील बांधावरील गेटच्या 32 पैकी एका रबरी ब्लाडरमध्ये  शनिवार, दिनांक 16 मार्च 2024 रोजी अचानक बिघाड झाल्‍याने पाणी गळती सुरू झाली. सदर ब्लाडरची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी 31 मीटर पर्यंत खाली आणण्यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला.


पाणी पातळी पूर्ववत होण्‍यासाठी वेळ लागणार 


बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरूस्‍तीचे काम सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  युद्धपातळीवर पूर्ण केले. भातसा धरणातून पुनश्च पाणी सोडण्यात आले  आहे मात्र, बंधा-याची पाणी पातळी पूर्ववत होण्‍याकरिता कालावधी लागणार असल्‍याने मंगळवार, दिनांक 19 मार्च 2024 रोजी एक दिवसासाठी संपूर्ण मुंबई महानगराच्‍या पाणीपुरवठ्यात 15 टक्‍के पाणीकपात केली जाणार आहे. भातसा धरणातून सोडण्‍यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्‍ये साठविले जाते. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्‍ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशया मार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. 


पिसे बंधा-याच्‍या गेटमधील रबरी ब्लाडर मधून दिनांक 16 मार्च 2024 रोजी अचानक बिघाड झाला. त्‍यातून पाणी गळती झाली. बंधा-यातील पाणीपातळी 31 मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्‍तीचे काम हाती घेण्‍यात आले. सोमवार, दिनांक 18 मार्च 2024 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत यांत्रिक झडपा दुरूस्‍तीचे काम पूर्ण करण्‍यात आले. 


भातसा धरणातून पिसे बंधा-यात पाणी सोडण्‍यात आले 


भातसा धरणातून पिसे बंधा-यात पाणी सोडण्‍यात आले आहे. तथापि, धरण ते बंधारा यातील अंतर सुमारे 48 किलोमीटर आहे. त्‍यामुळे पिसे बंधा-यातील पाणी पातळी वाढण्‍यास कालावधी लागणार आहे. बंधा-याची पाणीपातळी पूर्ववत होईपर्यंत म्‍हणजेच मंगळवार, दिनांक 19 मार्च 2024 रोजीच्‍या म्हणजे एक दिवस पाणीपुरवठ्यात 15 टक्‍के कपात करण्‍यात येणार आहे. नागरिकांना विनंती करण्‍यात येते की, त्‍यांनी पाण्‍याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.


इतर महत्वाच्या बातम्या


Raj Thackeray in Delhi: मोठी बातमी: महायुतीच्या जागावाटपात मनसेची एन्ट्री, राज ठाकरे दिल्लीला रवाना, अमित शाहांना भेटणार?