मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) तडकाफडकी दिल्लीसाठी (Delhi) रवाना झाले. यामुळे भाजप आणि मनसे (BJP-MNS) युतीच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे, अशात राज ठाकरे अचानक चार्टर्ड विमानाने दिल्लीसाठी रवाना झाल्याने महायुतीला नवा भिडू मिळणार का याची चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना
दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते दिल्लीत पोहोचले आहेत. त्यातच आता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेही दिल्लीत दाखल झाले आहेत. राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्याने लवकरच भाजप-मनसे युतीचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज ठाकरे दिल्ली दरबारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करतील अशी माहिती आहे.
भाजप-मनसे युती होणार?
एकीकडे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दुसरीकडे सर्व पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहे. महायुतीमध्येही जागावाटपाचा तिढा कायम असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आता राज ठाकरे दिल्लीत दाखल झाल्याने ही भेट मनसे आणि भाजप युतीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. मनसे आणि भाजप युतीच्या हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण मुंबई लोकसभेची जागा भाजपने मनसेसाठी सोडणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. त्यानंतर पुन्हा मनसे-भाजप युतीचं वातावरण विरलं. पण, आता मंगळवारी राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्याने या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.
राज ठाकरे दिल्लीत पोहोचले
मनसे भाजपचा नवा भिडू?
महायुतीकडून राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी गेल्या काही काळापासून जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. आता
राज ठाकरे दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठांची भेट घेतील अशी माहिती आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांची दिल्लीतील भाजप मु्ख्यालयात किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकी नंतर मनसे आणि भाजप युतीबाबत कोणता निर्णय होतो, हे स्पष्ट होईल.
दिल्ली दौऱ्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मला या असा निरोप होता, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. दिल्लीत पाय ठेवताच राज ठाकरे यांनी दिल्लीवारीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत सांगितलं की, मला या असा निरोप होता. राज ठाकरे बैठकीनंतर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :