मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर घेण्यात येणारा ब्लॉक हा रद्द करण्यात आलाय. यामुळे दिवाळीच्या दिवशी देखील प्रवाशांना अगदी निश्चिंत रेल्वेचा प्रवास करता येईल. ऐन दिवाळीच्या दिवशी मुंबईकरांना (Mumbai) प्रवासामध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता होती. कारण मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक (Megablock) घेण्यात येणार होता.


मध्य रेल्वेवर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार होता. तसेच हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 असा ब्लॉक होता. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. सध्या दिवाळीची लगबग सगळीकडे पाहायला मिळतेय. त्यातच आता मध्ये रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रवाश्यांना मात्र नाहक त्रास होणार असल्याचं म्हटलं जातं होतं. 


मध्य रेल्वेवर असा होता ब्लॉक


मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप आणि डीएन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार होता. या कालावधीमध्ये सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 हा ब्लॉक घेतला जाणार होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत  घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जाणार होत्या. त्यानंतर कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती.


हार्बर मार्गावर असा होता ब्लॉक 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार होता. सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल, बेलापूर, वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोडवरुन  सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे, गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 पर्यंत पूर्णपणे बंद राहणार होती. 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रेहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी  10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा ठप्प होती. त्याचप्रमाणे ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार होत्या.


हेही वाचा : 


Mumbai Metro : मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट; मेट्रो मार्ग 2अ आणि 7 वरील शेवटच्या ट्रेनच्या वेळेत बदल; शनिवारपासून वेळेत बदल होणार