मुंबई : कंगना रनौतविरोधात आता गीतकार जावेद अख्तर यांनीही मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. कंगनानं जाणीवपूर्वक सत्य माहिती कोर्टापासून दडवून न्यायालयाची दिशाभूल केली आहे, असा आरोप जावेद अख्तर यांनी केला आहे. 


कंगनाने पासपोर्ट नूतनीकरण करण्यासाठी हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान तिच्या विरोधात न्यायालयात एकही फौजदारी खटला प्रलंबित नाही, असं विधान तिच्यावतीनं तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केलं आहे. मात्र हे विधान खोटं आणि न्यायालयाची दिशाभूल करणारं आहे असा आरोप जावेद अख्तर यांनी केला आहे. जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. ज्यात कोर्टानं तिला अजामीनपात्र वॉरंटही बजावलं होतं. त्यामुळे कंगनाच्या वकिलांनी केवळ दोन फौजदारी तक्रारींची माहिती न्यायालयात दिली आणि अख्तर यांनी केलेल्या खटल्याची माहिती दडवून ठेवली, असा आरोप या याचिकेतून केला आहे. कंगनाला या खटल्याची माहिती आहे आणि तिने त्याबद्दल न्यायालयात सांगायला हवं होतं, असेही अख्तर यांनी म्हटलेलं आहे. आपल्याविरोधात केवळ देशद्रोह आणि कॉपीराईट याच प्रकरणात तक्रारीची नोंद आहे, या विधानाची नोंद घेत हायकोर्टानं तिच्या पासपोर्ट नूतनीकरणबाबत शक्य तितक्या जलदीने निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने पारपत्र विभागाला दिले आहेत. मात्र कंगनानं कोर्टात खोटे आणि दिशाभूल करत स्वतःचा फायदा करण्यासाठीच विधान केल्याचा जावेद अख्तर यांचा आरोप आहे. 


दिंडोशी सत्र न्यायालयात जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत हा खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंगनानं कोर्टापुढे हजेरी लावत आपल्याविरोधातील वॉरंट रद्द करून घेतलं आहे.


काय आहे प्रकरण?


एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतनं जावेद अख्तर यांनी त्यांच्या घरी बोलावून ऋतिक रोशन प्रकरणात आपल्याला माफी मागण्याचा सल्ला दिला होता. मात्र, हा सल्ला देताना त्यांनी आपला आवाज खूप जास्त चढवला होता, इतका की आपला थरकाप उडाला असा दावा कंगनानं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कंगनाची बहिणी रंगोली हिनंही या घटनेची पुष्टी करत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट टाकल्या होत्या. मात्र, या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होतेय, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी आता कायदेशीर मार्ग स्वीकारल्याचं समजतंय.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


कंगना रनौतला दिलासा; जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात जामीन मंजूर