मुंबई : कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत असल्याचं कारण देत आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या व्हिडिओमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुक व्हिडीओच्या माध्यमातून गंभीर इशारा दिलाय.


या व्हिडीओतून अमेय खोपकर म्हणाले की मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य याने आधीही अशीच दादागिरी केली आहे. यापूर्वीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला आहे. मी या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की कुठल्याही युनियनला मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी कोणीही सेटवर जाऊन शुटींग बंद पाडू शकत नाही, असा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे. त्यामुळे ही मनसेची धमकी समजा यापुढे कुठल्याही युनियन किंवा कोणीही शुटींगमध्ये व्यत्यय आणत असेल तर आमच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधा. अशा लोकांचा बंदोबस्त मनसेतर्फे करण्यात येईल. 


तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही : खोपकर
यापुढे कुठल्याही मराठी माणसाला शुटींगवर त्रास झाला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे. यावेळी परप्रांतियांची दादागिरी सहन केली जाणार नाही, असे सांगत खोपकर यांनी हिंदीमधून परप्रांतीयांना इशारा दिलाय. कुठल्याही मराठी माणसाला शूटिंग बंद करू किंवा पैसे देण्याचा तगादा लावला तर गाठ आमच्याशी आहे, अस कुठे घडत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना संपर्क करा. मी गृहमंत्र्यांना पत्र लिहून राकेश मौर्यवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. हा मनुष्यवधाचा गुन्हा नाही तर राकेश मौर्यने राजू सापते यांचा केलेला खूनच आहे, असा आरोपही खोपकर यांनी केलाय. 


राजू सापते यांनी मनसेशी एकदा संपर्क करायला हवा होता : खोपकर
राजू सापते यांची घटना खूप दुःखद आहे. मात्र, हे टोकाचं पाऊल उचलण्याअगोदर राजू सापते यांनी एकदा मनसेशी संपर्क करायला हवा होता, अशी खंत अमेय खोपकर यांनी बोलून दाखवली. यावेळी खोपकर यांनी चित्रपटसृष्टीतील सर्व मराठी बांधवांना आवाहन केलं की असं टोकाचं पाऊल उचलण्याअगोदर एकदा आपल्या कुटुंबाचा विचार करा.


दोषींवर कारवाई करावी : मेघराज भोसले 
कलादिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर आता कला क्षेत्रातील अनेक संघटना पुढे येऊन कारवाईची मागणी करत आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी या घटनेचा निषेध केला आहे. या बाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भोसले यांनी केलीय.