Mumbai Local Mega Block : मुंबईतील मशीद रेल्वे स्थानकाजवळील एका जीर्ण भिंतीचा भाग कोसळला. आज सकाळी ही घटना घडली. त्याच्या परिणामी सकाळी लोकल वाहतूक 15 मिनिटे उशिराने धावत होती. या जीर्ण भिंतीचा भाग काढण्यासाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या आपात्कालीन ब्लॉकच्या दरम्यान सीएसएमटी ते वडाळा दरम्यान हार्बर मार्गावर लोकल ट्रेन उपलब्ध राहणार नाहीत. ब्लॉकची वेळ दुपारी 2 ते 4 असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत दिली आहे. ब्लॉकच्या दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना कुर्ला, दादर येथून मुख्य मार्गावर प्रवास करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
आज सकाळी मशीद स्टेशनजवळ नागरी वस्तीच्या एका खाजगी भिंतीचा काही भाग ट्रॅक जवळ कोसळला. ही घटना सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पडलेला तो भाग लगेच दूर केला आणि सकाळी 7.30 वाजल्यापासून हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. त्या खाजगी भिंतीचा भाग सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. वाहतूक सुरळित ठेवण्याच्या दृष्टीने हा भाग सुरक्षित करणे महत्वाचे असल्याने थोड्याच वेळात दोन तासांचा आपात्कालीन ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वेकडून मुंबई महापालिकेला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे.
मुंबईत मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसाच्या परिणामी लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. हार्बर मार्गावर रेल्वे रुळांजवळ नागरी वस्ती आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंतीही बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकीच मशीद स्थानकाजवळील भिंतीचा एक भाग सकाळी कोसळला.