Sanjay Raut On Shiv Sena MLA : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज बंडखोर आमदारांना चांगलीच टोलेबाजी केली आहे. जेव्हा आमदारांनी मुंबईतून पलायन केलं त्यावेळी पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की, हिंदुत्व अडचणीत आलंय त्यामुळं आम्ही गेलोय. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधि देत नव्हता. तिसऱ्या दिवशी हे म्हणाले की, पक्षातील काही लोकं हस्तक्षेप करत होते, म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता चौथ्या वेळेला ते माझं नाव घेत आहेत. त्यांनी एक ठरवावं. नेमकं ते का बाहेर पडलेत यासाठी त्यांनी कार्यशाळा घ्यायला हवी. एकदा ठरवा की तुम्ही का गेले आहात. गोंधळू नका, लोकांना गोंधळात टाकू नका, असंही राऊत म्हणाले. 


संदिपान भुमरेंनी सामना कार्यालयात माझ्यासमोर लोटांगण घातलं


राऊत म्हणाले की, मी कधी सरकारी कामात पडलो नाही. मी संघटनेच्या कामात आहे, सामनात काम करतो. मुख्यमंत्र्यांच्या जवळपास मला तुम्ही खूप कमी पाहिलं असेल. पक्षाचं काम असेल तरच मी त्यांना भेटतो. संदिपान भुमरेंनी सरकार आल्यावर 'तुमच्यामुळं सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो' म्हणत सामना कार्यालयात माझ्यासमोर लोटांगण घातलं. त्याचे व्हिडीओ फुटेज सुद्धा असतील. संजय राठोड आदल्या दिवसांपर्यंत माझ्याबरोबर बसले. संजय राठोड यांच्या संकटात उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले, हे सगळ्यांना माहिती आहे. आमचं मन साफ आहे, कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, असं संजय राऊत म्हणाले.


जितेंद्र नवलानी यांची चौकशी थांबवली हे दुर्दैवी


संजय राऊत म्हणाले की, जितेंद्र नवलानी यांची चौकशी थांबवली हे दुर्दैवी आहे. त्यांची चौकशी का सुरु होती? हे चौकशी थांबवण्याचे आदेश देणाऱ्यांनी लोकांना सांगायला हवं. आधीच्या सरकारनं ही चौकशी का लावली हे तपासायला हवं. माझ्याकडे याबाबत अधिकची माहिती आलेली नाही. मी यावर अधिक याक्षणी बोलत नाही कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असं संजय राऊत म्हणाले.  


शिवसेना मजबूत आहे, खंबीर आहे. हे 40 लोकं गेल्या शिवसेनेचा एक कपचाही उडालेला नाही. शिवसेना जमिनीवर आहे. भविष्यात निवडणुका होतील त्यावेळी जनता शिवसेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे हे आम्ही दाखवून देऊ, असं राऊत म्हणाले.  संजय राऊतांनी सांगितलं की, राजन विचारे हे आता लोकसभेत पक्षाचे प्रतोद आहेत. भावना गवळी या पूर्णवेळ येत नव्हत्या. पक्षाला पूर्णवेळ प्रतोदाची गरज आगामी काळात आहे, असं राऊत यांनी सांगितलं.