मुंबई :  लोकल ट्रेन (Mumbai Local Train) ही मुंबईकरांची लाइफलाईन समजली जाते. लोकल ट्रेनच्या माध्यमातून दररोज जवळपास 40 लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. सामान्यांच्या आयुष्यात रेल्वेचा महत्त्वाचा वाटा आहे. किफायतशीर दरात प्रवास करता येत असला तरी अनेकजण हे विनातिकीट प्रवास करतात. अशा प्रवाशांवर कारवाई केली जाते. मुंबईतील एका तिकीट तपासणीसने (TC) कमालच केली आहे. या पठ्ठ्याने अवघ्या सहा महिन्यात एक कोटींपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. 


मध्य रेल्वेने (Central Railway) ही माहिती दिली आहे. सुनील नैनानी असे या मध्य रेल्वेच्या टीसींचे नाव आहे. सुनील नैनानी हे सर्वाधिक विनातिकीट प्रवासी पकडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात त्यांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड म्हणून एक कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल केली आहे. 


सुनील नैनानी यांच्या या कामगिरीचे मध्य रेल्वेने कौतुक केले आहे.  मध्य रेल्वेने याबाबतचे एक ट्विट केले आहे. यामध्ये नैनानीने ठोठावलेल्या दंडाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने सोशल मीडिया X वर एका पोस्टद्वारे सांगितले की, मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकात तैनात असलेल्या टीटीई सुनील नैनानी यांनी चालू आर्थिक वर्षात वैयक्तिक तिकीट तपासणीच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल रेल्वेला मिळवून दिला आहे. त्यांनी यावर्षी 1 एप्रिल ते 13 ऑक्टोबर दरम्यान 10,426 विनातिकीट प्रवाशांकडून 1 कोटी दोन हजार 830 रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी देखील सुनील नैनानी यांनी 18,413 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 1.62 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता.


 






या टीसींचीदेखील दमदार कामगिरी 


2022-23 या आर्थिक वर्षात मुंबई विभागातील एकूण 4 टीटीईंनी स्वतंत्रपणे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. भीम रेड्डी यांनी 11 हजार 178 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 1.03 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एम.एम. शिंदे यांनी 11 हजार 145 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला. तर आर.डी. बहोत यांनी 11 हजार 292 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.