मुंबई : दसरा मेळावा (Dasara Melava) आझाद मैदानावर (Azad Maidan) घेण्याचा निर्णय शिंदे गटाकडून (Shinde Group) घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचा मेळावा हा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. शिंदे गटाकडून क्रॉस मैदान आणि आझाद मैदान ही दोन मैदानं ठरवण्यात आली होती. पण हा मेळावा आता आझाद मैदानावर घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. क्राॅस मैदान यावरती क्रिकेटच्या मैदानांचे पिच आणि मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने आझाद मैदानवर शिंदे गटाचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे. दरम्यान पोलिसांनी देखील या मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला दिली आहे. 


दसऱ्याच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मेळाव्यसाठी यंदादेखील ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शिवाजी पार्क मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण शिंदे गटाने माघार घेत हा मेळावा दुसऱ्या मैदानावर घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर दसरा मेळावा आता कुठे घ्यायचा यावर पक्षामध्ये बरीच चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर क्रॉस मैदान आणि आझाद मैदान या दोन मैदांनांचा विचार करण्यात आला. त्यानंतर आझाद मैदानावर शिंदे गटाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 


शिंदे गटाची माघार 


दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? या प्रश्नाकडे सध्या शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं. पण शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर  यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ठाकरेंचा शिवाजी पार्क मैदानासाठीचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. पण, याचा अर्थ ठाकरेंना मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? असाही प्रश्न उपस्थित होत होता. पण  मुंबई महापालिकेच्या (BMC) जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? या प्रश्नाचा निकाल अखेर लागला. 


शिवाजी पार्कात ठाकरेंचा आवाज घुमणार 


दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षात देखील ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात होणार आहे. त्यामुळे यंदा देखील शिवाजी पार्क मैदानात ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. मागील वर्षी देखील मैदानावरुन वाद निर्माण झाला होता. पण त्यावेळी देखील ठाकरेंनाच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्काचं मैदान मिळालं होतं. तर शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला होता. पण यंदा बीकेसीच्या मैदानावर अनेक कामं सुरु असल्याचे शिंदेंना दसरा मेळावा तिथे घेणं शक्य नव्हतं. 


त्यामुळे यंदा देखील दसरा मेळाव्याच्या मैदानावरुन वाद सुरु झाला होता. तर त्याच पार्श्वभूमीवर आता हा तिढा सुटला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर यंदाचे देखील हे दोन्ही मेळावे जोरदार होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Dasara Melava 2023: ठरलं! यंदा शिवाजी पार्कवर आवाज ठाकरेंचाच; मुंबई महापालिकेकडून दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला परवानगी