Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) मारहाणीच्या घटना सातत्यानं घडत असल्याचं समोर येतं. रोज कुठेना कुठेना अगदी क्षुल्लक कारणांवरुन बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. सीटवर बसण्यावरुन तर नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात. असाच एक प्रकार ट्रान्स हार्बर लाईनवर ठाणे-पनवेल (Thane Panvel Trans Harbor Line) दरम्यान घडला आहे.
रेल्वे लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून तीन महिलांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ, फ्री स्टाईल हाणामारीमध्ये झाले. यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या रेल्वे महिला पोलीस कर्मचाऱ्याला सुध्दा आरोपी महिलेनं मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून यात मारहाणीचा भीषण प्रकार दिसून येत आहे.
ठाण्याकडून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी महिलांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी
आरजू तोवित खान असं मारहाण करणाऱ्या आरोपी महिलेचं नाव आहे. दसऱ्याच्या दिवशीचा हा व्हिडीओ आहे. दसऱ्या दिवशी संध्याकाळी ठाण्याकडून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी महिलांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लोकलमधील बसण्याचे आसनावरून तीन महिलांमध्ये बाचाबाचीने सुरुवात झाली.
शाब्दिक वादाचे रूपांतर तुफान मारामारीत
ठाण्यावरून बसलेल्या आरजू तोवित खान आणि गुलनाज जुबेरखान यांनी स्नेहा देवडे या महिलेशी सीटवरून वाद सुरू केला. त्यानंतर या शाब्दिक वादाचे रूपांतर तुफान मारामारीत झाले. या लोकलमध्ये नेरूळ स्थानकातून महिला पोलीस कर्मचारी शारदा उगले भांडण सोडवण्यासाठी चढल्या.
मात्र यावेळी मारामारी करणाऱ्या आरोपी आरजू तोवित खान हिने महिला पोलिसाला सुध्दा मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला लागून त्या देखील रक्तबंबाळ झाल्या. स्नेहा देवडे या देखील या मारहाणीत जखमी झाल्या आहेत.
दोघींवर वाशी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
यामध्ये डोक्याला इजा होवून जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचारी शारदा उगले यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकणी महिला आरोपी आरजू खान आणि गुलनाज जुबेरखान या दोघींवर वाशी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महिला आरोपी आरजू खान हिच्यावर चोरीचा गुन्हा या आधी दाखल आहे. तर तिचा पती हत्येच्या केसमध्ये तुरूंगात आहे.
या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या