Bandra-Worli Sea Link Accident : मुंबईतील (Mumbai) वांद्रे-वरळी सी लिंकवर (Bandra Worli Sea Link) झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 304 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इरफान अब्दुल रहीम बीलकिया असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर ओव्हर स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंगचा आरोप आहे.
या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी (5 ऑक्टोबर) पहाटे साडे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पोल नंबर 76 आणि 78 जवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातात गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी काहींची प्रकृती नाजूक असल्याचं कळतं.
काही वेळ आधीच अपघात झाला होता
खरंतर जिथे हा अपघात झाला तिथे आधीच अपघात झाला होता आणि जखमींना घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स देखील उभी होती. सोबतच काही वाहनं रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी भरधाव वेगाने कार आली आणि तिने तिथे असलेल्या इतर गाड्या आणि अॅम्ब्युलन्सला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.
मृतांची नावे
गजराज सिंह (वय 26 वर्षे, रा. मध्य प्रदेश), सत्येंद्र फौजदार (वय 27 वर्षे, रा. भरतपूर), राजेंद्र (वय 40 वर्षे, रा. झांसी), चेतन कदम आणि अॅम्ब्युलन्स चालक सोमनाथ साळवे अशी मृतांची नावं आहेत. सत्येंद्र, राजेंद्र, गजराज हे सी लिंकवर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.
संबंधित बातमी
Worli Sea Link Accident : वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू; सहा जखमी