मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा ट्रेलर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसणार असून शिवसेनेकडून या ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने या आधीच मुरजी पटेल यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार असून या निमित्ताने शिवसेना आणि शिंदे-भाजप गट पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत.
अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. शिवसेनेमधील ऐतिहासिक फुटीनंतर या ठिकाणच्या जागेवर सुरुवातीला शिंदे गटाकडून दावा करण्यात आला होता. पण या ठिकाणचे भाजपचे मुरजी पटेल यांनी या ठिकाणाहून आधीपासून तयारी सुरू केली होती. मुरजी पटेल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने या ठिकाणी भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे असा थेट सामना अंधेरीमध्ये होणार आहे. 2019 मध्ये युतीमध्ये अंधेरीची जागा शिवसेनेने जिंकली होती. परंतु आता मुंबईत पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना या निवडणुकीच्या निमित्ताने रंगेल.
2019 मध्ये अंधेरीत काय समीकरण होतं?
- 2019 विधानसभामध्ये भाजप आणि शिवसेनाची युती झाल्यामुळे शिवसेनाचे दिवंगत उमेदवार रमेश लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा मधून तिकीट मिळालं.
- त्यामुळे नाराज मुरजी पटेल 2019 विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे होते.
- त्यावेळी मुरजी पटेल यांना 45808 मत मिळाली होती.
- तर शिवसेना आमदार रमेश लटके यांना 62,772 मते मिळाली होती.
- 2019 विधानसभा निवडणुकीत 16,964 मतांनी रमेश लटके विजयी झाले होते.
विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या आधीच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध भाजप-शिंदे गट अशी होणार आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे. शिवाय शिवसेनेचा निवडणूक चिन्ह कोणाला मिळतं याचीही उत्सुकता आहे.