मुंबई : कुठे इंडिकेटर दुरुस्ती सुरु आहे, तर कुठे स्टेशन सॅनिटायझेशनचं काम सुरु आहे. ही सर्व तयारी सुरु आहे, 1 फेब्रुवारीसाठी... कारण एक फेब्रुवारीला मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिवस असणार आहे. याच दिवशी तब्बल दहा महिन्यांनंतर मुंबईकरांना लोकलची दारं खुली करण्यात येणार आहेत. त्यादिवशी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन रेल्वेनं पूर्वतयारी सुरु केली आहे. "कमी प्रवासी असल्यामुळे आम्ही काही तिकीट खिडक्या, पादचारी पूल आणि लिफ्ट बंद ठेवल्या होत्या. आता मात्र त्या पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरु करत आहोत", असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं आहे.


एक फेब्रुवारीला सकाळीच तिकीट आणि पास काढण्यासाठी मोठ्या रांगा लागण्याची शक्यता आहे. तसेच जरी मर्यादित कालावधीसाठी सर्वसामान्य प्रवाशांना प्रवेश दिला असला तरीदेखील रेल्वे स्थानकांमध्ये तसेच लोकलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशी गर्दी करू नये यासाठी आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस देखील सज्ज झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेळेत जर सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवास केला तर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे. "सर्वसामान्य प्रवाशांसाठी राज्य सरकारने वेळ ठरवून दिलेली आहे, त्यामुळे त्यावेळी त्यांचं पालन करणं आवश्यक आहे, तसेच मास्क घालून प्रवास करणं अपेक्षित आहे, अन्यथा त्यांच्यावर कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अन्वये आम्ही कारवाई करणार आहोत", असं लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितलं आहे.


असं असलं तरी अनावश्यक गर्दी न करता सर्व नियमांचं पालन करून सुखरूप प्रवास करावा, असं आवाहन पोलीस आणि रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रेल्वे आणि पोलिसांच्या या आवाहनाला प्रवाशांनी देखील प्रतिसाद देणं तितकंच गरजेचं आहे. लोकलमध्ये गर्दी होणार सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यातही सुरक्षिततेचे नियम पाळण्याची जबाबदारी आता प्रवाशांची आहे. "माझा प्रवास, माझी जबाबदारी" मानून जर सर्वांनी प्रवास केला तरच येणाऱ्या काळात वेळेचे बंधन न ठेवता सर्व सामान्य प्रवासी कधीही प्रवास करु शकतील.


दरम्यान, 22 मार्च 2020 पासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा पूर्णतः बंद करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळाला. मात्र आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच राज्य सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे हा कोरोना आता कुठे आटोक्यात आला आहे. मात्र तो संपलेला नाही. त्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन करणं गरजेचं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :