मुंबई : राज्य सरकारनं अखेर मुंबई लोकलची दारं सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, यासाठी काही विशिष्ठ वेळा नेमून दिल्या आहेत. या वेळांमध्येच सर्वसामान्य लोकांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार आहे. गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे. परंतु, भाजपकडून सरसकट सर्वांसाठी मुंबई लोकल सुरु करा, अशी मागणी केली आहे.


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "मुंबई लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी जी वेळ दिली आहे की, सरसकट असली पाहिजे. एक खरं आहे की, टप्प्याटप्प्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. एकाच वेळेला गर्दी होता कामा नये. पण सरसकट वेळ असणंही गरजेचं आहे."


पाहा व्हिडीओ : कल सेवा सर्वांसाठी खुली; पाहा काय म्हणतात सर्वसामान्य प्रवासी



भाजप नेते राम कदम यांनीही ट्वीट करत राज्य सरकारच्या मुंबई लोकल सुरु करण्याच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राम कदम ट्वीट करत म्हणाले आहेत की, "लोकल ट्रेन पाच महिने उशिरा सुरू करण्याचा महाराष्ट्रसरकारचा निर्णय, सरकारचा निष्काळजीपणा दाखवतो, मंदिरा अगोदर बार उघडण्याची घाई करणारं महाविकास आघाडी सरकार या गोष्टीचे उत्तर कधी देणार? सकाळी 7 च्या अगोदर रात्री 9,30 नंतर या ट्रेन चा फायदा कोणाला ? का पुन्हा एकदा बारवाल्याची चिंता?" आणखी एक ट्वीट करत राम कदम म्हणाले की, "सरकारच्या निष्काळजीपणामुळे लाखो लोकांना नुकसान झालं, दूर राहणाराच्या नोकर्‍या गेल्या, बदल्यांच्या पाठीमागे लागलेले हे सरकार, जनतेच्या प्रती गंभीरता कधी दाखवणार?" असा प्रश्नही राम कदम यांनी उपस्थित केला आहे.





दरम्यान, सर्वांसाठी लोकल प्रवासाची सेवा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची गरज लक्षात घेऊन आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई आणि उपनगर परिसरातील कार्यालयं आणि आस्थापनांना आपापल्या कार्यालयीन वेळांमध्ये आवश्यक तो बदल करावा, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे. पण अशातच राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या या वेळांमध्ये प्रवास करणार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. ठराविक वेळेत सर्वसामान्य मुंबईकरांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आलीय. मात्र, कार्यालयीन कामाच्या वेळेतच प्रवासांवर निर्बंध आहेत. त्यामुळे मुंबई लोकल सुरु होत असली, तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र याचा कितपत फायदा होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Mumbai Local | मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांना गुड न्यूज, 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु