मुंबई : मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. इथं बचावकार्य अजूनही सुरु आहे. तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी जाहीर केले आहे. मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. आजही पाउस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे.
कोविड संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामुग्री यांची काळजी घ्यावी व सावध राहण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेस सांगितले आहे.पावसामुळे जिथे जिथे पाणी साचले आहे त्याठिकाणी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करावी, रस्ते मोकळे करावेत , वाहतुकीवर परिणाम झालेला आहे मात्र लवकरात लवकर ती सुरळीत होईल असे पाहावे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील रेल्वे वाहतूक कशी पूर्ववत होईल हे बघण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला दिल्या.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा
दरम्यान, मुंबईत भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे. तर या घटनांमधील जखमींना 50 हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीची घटना पाहून व्यथित झालो आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
चेंबूरमधील घटना हृदयविदारक देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, घटनेबाबत ऐकून स्तब्ध झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या परिजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना संकटातून सावरण्याची शक्ती देवो, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
शनिवारी मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे 17 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून घरांच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत पडल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून तीन जणांचा मृत्यू
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.