मुंबई :  मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अशात पावसामुळं दरड आणि घरं कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत. शनिवारी मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे 17 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून घरांच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत पडल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.


 






Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक ट्रेन रद्द, लोकल सेवेवरवही परिणाम


विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून तीन जणांचा मृत्यू
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 


मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, कुर्ल्यातील क्रांतीनगर वस्ती खाली करायला सुरुवात
मिठी नदी धोक्याच्या पातळीच्या खूप वर गेली 3.3 मीटर अशी धोक्याची पातळी आहे. मात्र आता मिठी नदीचे पाणी 4.2 झाले आहे, म्हणजे ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे पालिकेने आजूबाजूच्या वस्त्या खाली करण्यास सुरुवात केली आहे. कुर्ला येथील क्रांती नगर खाली केले जात आहे. सर्व कुटुंबाना पालिकेच्या शाळांमध्ये नेले जात आहे.


मुंबईतील दादर, परळ परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोबतच दक्षिण मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पुढील काही तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आयएमडी मुंबईने काल रात्री साडे बारा वाजता जाहीर केलं होतं.  


सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द


रेल्वे सेवेवरही पावसामुळे परिणाम झाला असून सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या लोकल ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशी एक तास प्रतीक्षा करुन परत घरी जात आहेत. बाहेरून  येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवरही होत आहे. येत्या दिवसभरात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई उपनगरातील काही भागात पावसाच्या पाण्यामुळे टू व्हिलर गाड्या वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी आल्याने आज दिवसभर लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अंधेरीच्या अनेक भागात पाणी साचलं आहे तर कांदीवलीमधील काही भागातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.