मुंबई : नवसाला पावणारा अशी ख्याती मुंबईतील (Mumbai) लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) असून त्याच्या दर्शनासाठी राजकीय नेते, सेलिब्रेटी ते सर्वसामान्य लोकांची नेहमी गर्दी असते. दरवर्षी लालबागच्या राजाच्या नवसपेटीमध्ये असंख्य पत्रं येत असतात. यातील एक भावनिक पत्र (Emotional Letter To Lalbaugcha Raja) सध्या चर्चेत आलं आहे. वाशीमध्ये राहणाऱ्या एका महिला भाविकाने हे पत्र लालबागच्या राजाला लिहिले आहे.


वाशीमध्ये राहणाऱ्या या महिलेच्या मुलीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनासाठी 2019 मध्ये ती मुलगी आणि तिची आई या नवसाच्या रांगेमध्ये तब्बल आठ तास उभ्या राहिल्या होत्या. या दरम्यान त्या मुलीचा आणि त्या ठिकाणी असलेल्या सिक्युरिटी गार्डसोबत वाद झाला. त्याच दिवशी त्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 


याच विषयावर त्या आईने लालबागच्या राजाला एक भावूक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात म्हटलं आहे की,  2019 मध्ये लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि माझी मुलगी आठ तास उभी राहिलो होतो. रांग जराही पुढे न सरकल्याने माझ्या मुलीचे पाय खूप दुखत होते. त्यामुळे माझी मुलगी त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डसोबत बोलायला गेली. तिथे त्याने तिच्या मनाला लागेल असं काहीतरी चुकीची भाषा वापरून विचित्र उत्तर दिलं. ते ऐकूनच माझ्या मुलीने मला घेतलं आणि रांगेतून बाहेर निघून दर्शनासाठी न थांबता घरी निघालो. माझ्या मुलीचं मानसिक संतुलन त्या दिवशी बिघडले आणि तिने त्या दिवशी संध्याकाळी गळफास घेऊन स्वतःला संपवले. 


त्या आईने पाठवलेल्या या पत्रामध्ये तिच्या मुलीने काढलेले एक चित्रसुद्धा दाखवण्यात आले आहे. यामध्ये नवसाचा रांगेत लागलेल्या भाविकांना खुर्च्या देण्यात याव्यात अशा आशयाचं चित्रण केलं होतं. नवसाचा रांगेतील भाविकांना याच भाग खुर्च्या देऊन तिच्या दिवंगत आत्म्यास शांती मिळावी अशी इच्छा या आईने लालबागच्या राजाली लिहिलेल्या पत्रात (Emotional Letter To Lalbaugcha Raja) व्यक्त केली आहे.


मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दानपेटीत गणेशभक्तांकडून जितकं सढळ हातानं दान करण्यात येतं, तितक्याच सहजतेनं काही भक्त आपलं मनही देवाकडे मोकळं करत असतात. ही भक्तमंडळी दरवर्षी लालबागच्या राजाला पत्र लिहून गाऱ्हाणं मांडत असतात. असंच एक पत्र या माऊलीनं लालबागच्या राजाला लिहिलं आहे.