मुंबई : मुंबईतील (Mumbai) मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अखेर  मनसे विभाग प्रमुख विनोद अरगिले या पदधिकाऱ्याविरोधात नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाढ या तीन जणांना ताब्यात घेतले आहे.


मुंबईतील मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मनसेचे उपविभाग प्रमुख विनोद अरगिले यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती,   व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागपाडा पोलिसांनी विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाढ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या तिघांच्या विरोधात नागपाडा पोलिसांनी कलम 323, 337, 506, 504, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. मुंबईतील मुंबादेवी परिसरात एका ठिकाणी गणपतीचा मंडप उभारला जात होता. त्याच ठिकाणी बॅनर लावण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांच्या समोर बांबू लावले जात होते. तेथील एका मेडिकल शॉपसमोर काही मनसे पदाधिकारी बांबू लावत होते. त्यावेळी व्हिडीओमध्ये दिसत असलेली महिला. महिलेने त्यांना ते बांबू लावण्यास विरोध केला. त्यावेळी मनसेचा उपविभाग प्रमुख विनोद अरगिले याच्याकडून महिलेला मारहाण करण्यात आली. 


मनसे उपविभाग प्रमुख विनोद आरगिले यांनं बोलताना म्हटलं की, या व्हिडीओमध्ये फक्त एकच बाजू दिसतेय. ती महिला आमच्या अंगावर धावून आली. त्यानंतर तिनं अर्वाच भाषेत शिवीगाळही केली. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच यापूर्वीही त्या महिलेविरोधात तक्रार केल्याचं मनसे पदाधिकाऱ्यानं सांगितलं. तसेच, महिलेनं आमच्या अंगावर येऊन आमची कॉलर धरणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं. तिनं आमच्या अंगावर धावून आली म्हणजे, आम्ही आमच्या बचावासाठी काहीच करायचं नाही का? आम्ही महिलांचा आदर करणं गरजेचं आहेच. पण त्यांनीही आमचा आदर राखणं गरजेचं आहे, असंही मनसे पदाधिकाऱ्यानं म्हटलं आहे.