मुंबई: राज ठाकरे यांची आज घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. 


राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गणेशोत्सवानिमित्त एक आनंदाचं वातावरण आपण सगळीकडे पाहतो. त्यानिमित्ताने आपण एकमेकांच्या घरी जातो. राज ठाकरे यांची आपण केवळ सदिच्छा भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज ठाकरे यांचे ऑपरेशन झालं होतं, त्यावेळीच मी त्यांना भेटणार होतो. पण आता गणेशोत्सवानिमित्ताने त्यांची भेट घेतली. या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तसेच आगामी निवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही समीकरणाची जुळवाजुळव करण्यात आली नाही. 


जुन्या आठवणींना उजाळा 


मुख्ममंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आजच्या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आनंद दिघे साहेबांच्या आठवणी या वेळी चर्चेमध्ये निघाल्या. राज ठाकरे यांचेही आनंद दिघे यांच्यासोबत चांगले संबंध होते. शेवटी आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं."


दसरा मेळावा कोण घेणार? 


शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार यावरुन वाद सुरू असून त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अजून गणपती सुरू आहे, त्यानंतर दसरा येईल. त्यावेळी आपण पाहू. राज्य सरकारच्या पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आहेत. त्यामुळे हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. अतिशय कमी वेळात आम्ही चांगलं काम केलं आहे. हे काम असंच सुरू राहणार.


भाजप-मनसे युती होणार का? 


मुख्यमंत्र्यांच्या भेटी आधी काही दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. परंतु दोघांनीही या भेटीबाबतचं वृत्त नाकारलं होतं. त्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या सुमारास भाजप नेते विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि त्यांच्यात खलबतं झाली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. त्या आधी नितीन गडकरी, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का असेही तर्कवितर्क लढवले जात आहेत.