एल्फिन्स्टन स्टेशनवरील ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं असल्याचं मत हायकोर्टाने व्यक्त केलं. मृतदेहांचाही सन्मान करायला हवा, अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं.
डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना कपाळावर स्केचपेननं नंबर टाकल्याची माहिती यावेळी राज्य सरकारने दिली. जाब विचारणाऱ्या नातेवाईकांवर पोलिसांकडून केसेस दाखल होणं धक्कादायक असल्याचंही मुंबई हायकोर्टाने सांगितलं.
भविष्यात अश्याप्रकारची घटना घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी यंत्रणा अजून सक्षम करण्याची गरजही कोर्टाने व्यक्त केली.
आरटीआय कार्यकर्ता प्रदीप भालेकर यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. केंद्र सरकार, रेल्वेसह इतर प्रतिवादींना उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होत.
29 सप्टेंबर 2017 रोजी एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांना प्राण गमवावे लागले होते, तर अनेक जण जखमी झाले होते.