मुंबई : मुंबईतील 25 वर्षीय अँकर अर्पिता तिवारीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी घडलेल्या घटनेनंतर मालाडमधील मालवणी पोलिसांनी बुधवारी सकाळी विविध अनुषंगाने तपास केला आणि हत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.


मालाडमधील 15 मजली इमारतीवरुन कोसळल्याने अर्पिताचा मृत्यू झाला होता. अर्पिता बॉयफ्रेण्ड पंकज जाधवच्या फ्लॅटमध्ये होती आणि बाथरुमच्या खिडकीतून कोसळून तिचा मृत्यू झाला होता. अर्पिताने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या मित्रमैत्रिणींनी केला आहे. तर कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचं म्हटलं आहे आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अर्पिताला ढकललं असावं: बहिणीचा आरोप
दुसरीकडे, अर्पिताला पंधराव्या मजल्यावरुन ढकललं असावं, असा अंदाज तिची बहिण शिल्पाने वर्तवला आहे. तसंच आपली बहिणी आत्महत्या करणार नाही, असंही तिचं म्हणणं आहे.

पोलिसांचा दावा
पोलिसांच्या माहितीनुसार, अर्पिताचं तिच्या बॉयफ्रेण्डसोबत वाद सुरु होते. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि क्राईम सीन रिक्रिएट केला. पोलिसांनी आत्महत्या, चुकून कोसळणं आणि जाणीवपूर्व धक्का देऊन खाली पाडणं या सर्व शक्यतांवर विचार केला.

मुंबईत अँकर तरुणीची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या

...त्यामुळे हत्येचा संशय अधिक : पोलिस
अर्पिताला धक्का देऊन खाली पाडण्याची शक्यता, आत्महत्या किंवा अचानक पडण्यापेक्षा जास्त आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला होता, त्यामुळे संशयाला जागा आहे, असं तपास पथकाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

मृत्यू झाला त्या दिवशी अँकरने मद्यपान केलं असलं तरी ती कपड्यांशिवाय उडी मारणार नाही. यासोबतच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या चार जणांचे जबाबही परस्परविरोधी आहेत, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.

आरोपीला लवकरच बेड्या ठोकू
या प्रकरणात अद्याप कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. आम्ही हत्या आणि पुरावे मिटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकू, असं मालवणी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक पठांगडे यांनी सांगितलं.