मुंबई : मेट्रो 3 प्रकल्पासाठी फोर्ट भागात भुयार खोदण्याच्या कामाला मुंबई हायकोर्टाने दोन आठवड्यांची तात्पुरती स्थगिती दिली आहे. जे एन पेटीट ग्रंथालय आणि उद्यानाच्या आसपासच्या भागात भुयाराचं खोदकाम करु नये, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.


भुयार खोदताना हेरिटेज इमारतींना धोका पोहोचू शकतो ही भीती व्यक्त करणारी एक याचिका या संस्थेने मुंबई हायकोर्टात दाखल केली आली आहे. त्यावर सुनावणीदरम्यान हायकोर्टाने भुयार खोदण्याच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

मात्र या भुयार खोदण्याच्या कामामुळे खरोखरच हेरिटेज इमारतींना धोका पोहोचणार आहे का याची पाहणी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती पूर्ण दक्षिण मुंबईतील मेट्रोचं काम सुरु असलेल्या भागातल्या इमारतींची पाहणी करणार आहे.


मेट्रो 3 मुळे फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींना धोका असल्याचा दावा करत जे एन पेटीट या 119 वर्ष जुन्या संस्थेच्या ट्रस्टींनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

पूर्णपणे भुयारी मार्ग असलेल्या अंधेरी सीप्झ ते कुलाबा या मार्गाच्या कामाकरता जी अवजड यंत्रसामुग्री मागवण्यात आली आहे, त्याच्या व्हायब्रेशन्समुळे अनेक जुन्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. तसंच जमिनीखाली खोदकाम करताना शेकडो वर्षापूर्वीच्या काही जुन्या इमारतींना यामुळे नुकसान होण्यास सुरुवात झाल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान हायकोर्टाने गेल्या सुनावणी दरम्यान हे स्पष्ट केलं होतं की, आयआयटी मुंबईकडून हायकोर्टाच्या इमारतीची मेट्रो3 च्या संदर्भात पाहाणी करण्यात येणाराय. त्यांच्या मदतीनं इतरही इमारतींची पाहाणी करता येऊ शकेल.