नवी मुंबई: नवी मुंबईत सर्वात विकसित विभाग म्हणून टेंबा मिरविणाऱ्या सिडकोने या विभागाला नेहमीच पाण्यापासून वंचित ठेवले आहे. खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे, मात्र सिडकोने या भागातील पाणी प्रश्न सोडविलेला नाही.
गेल्या अनेक वर्षापासून खारघरवासीय पाणी प्रश्नावरून सिडकोविरोधात आंदोलन करीत आहेत. अखेर आज पाणी न मिळाल्याने रहिवाशांनी खारघरमधील सिडको कार्यालयाला टाळे ठोकले.
रहिवाशांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेरून पळ काढला. दुपारपर्यंत रहिवाशांनी कार्यालयाच्या समोर ठाण मांडल्याने सिडकोचे कार्यालय उघडू शकले नाही.
एकीकडे खारघरमध्ये धो धो पाऊस सुरु आहे, मात्र पावसाळ्यातही खारघरवासियांना पाण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे.