Death Penalty for rapist murder : शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तिघांची फाशी रद्द करत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असताना दुसरीकडे आणखी एका प्रकरणात दोषीची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. ठाणे येथील कासारवडवलीत 2013 मध्ये झालेल्या चिमुरडीवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषीच्या फाशीची शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली आहे.  


कासारवडवलीत साल 2013 मध्ये अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. यात नराधम रामकिरत मुनीलाल गौड याची फाशी मात्र हायकोर्टानं कायम ठेवली आहे. 30 सप्टेंबर 2013 रोजी घराजवळ खेळत असलेल्या चिमुरडीला गौडने जवळच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये नेऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला होता आणि नंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह जवळच्या परिसरातील एका खंदकात लपवला होता. स्थानिक पोलिसांनी गौडला 30 ऑक्टोबर 2013 रोजी अटक केली होती. आरोपी विरोधात विशेष पॉक्सो कोर्टात खटला चालला. ठाणे सत्र न्यायलयाने रामकिरत गौड याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. 


या शिक्षेच्या विरोधात त्याने हायकोर्टात अपील दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने या प्रकरणातील त्याची शिक्षा कायम ठेवली. तर, नवी मुंबईतील बेलापूरमध्ये सामूहिक बलात्कार व महिलेची हत्या केल्याच्या साल 2012 मधील प्रकरणातील दोषी रहिमुद्दीन मोहफुज शेख उर्फ जॉन अँथनी डिसूझा उर्फ बाबू उर्फ बाबा याचीही फाशीची शिक्षा हायकोर्टानं रद्द केली. 


शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना जन्मठेप 


शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं तिघांची फाशी रद्द करत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फाशीच्या शिक्षेनं आरोपीतील पश्चात्तापाची संकल्पना संपुष्टात येते. या प्रकरणात दोषी हे फाशीच्याच शिक्षेसाठी पात्र आहेत, असं म्हणता येणार नाही. मात्र ते आयुष्यभर पश्चात्तापासाठी पात्र आहेत. त्यांच्या बाबतीत सुधारणेविषयी काहीही वाव नाही आणि समाजात पुन्हा वावरण्यासाठीही ते पात्र नाहीत. असं महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं आपल्या निकालात नोंदवलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


... तोवर वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही, नवाब मलिकांची हायकोर्टात हमी, वानखेडे कुटुंबियांना दिलासा


70 रुपयांमुळं बाजार उठला! सत्तर रुपयांची लाच घेणाऱ्या महाभागाला नागपुरात एसीबीकडून बेड्या