ST Workers Strike updates : राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेतल्यानंतर मागील काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन संपुष्टात येईल असं वाटत होतं. मात्र एसटी आंदोलक संप मागे घ्यायला तयार नाहीत. आझाद मैदानावरील एसटी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आले असल्याचे सांगत एसटी कामगारांचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून पडळकर, खोत यांची माघार; पुढील निर्णय कामगारांनी घेण्याचे आवाहन
आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी आंदोलक विलिनीकरणावरच ठाम
आझाद मैदानावरील आंदोलन कर्मचारी हे विलिनीकरणावरच ठाम असणार आहेत. सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर हे जरी आझाद मैदानावर येणार नसले, तरी त्यांचा पाठिंबा आपल्याला आहे. त्यामुळे ही लढाई अशीच सुरू राहणार असल्याचं एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. शिवाय, एसटी कर्मचारी शिष्टमंडळ परिवहन मंत्र्यांच्या बैठकीसाठी गेले होतो. त्यांनी सुद्धा कालच्या बैठकीत आम्ही समाधानी नव्हतो म्हणूनच पत्रकार परिषदेला आम्ही समोर आलो नाही, असं म्हटलं होतं.
एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे अल्टीमेटम
दुसरीकडे एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आलं आहे. आज आणि उद्या दोन दिवसांत कामावर रुजू व्हा, नाहीतर परवापासून निलंबीत कर्मचाऱ्यांवर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे. जे कर्मचारी निलंबित झालेत ते कामावर रुजू झाल्यास निलंबन मागे मात्र, परवापासून कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागी भरती प्रक्रियेतील वेटिंग लिस्टवरील कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. संपावर आहेत मात्र अद्याप निलंबन झालेले नाही अशा कर्मचाऱ्यांवरही परवापासून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर
गुरुवारी भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांनी उत्सुर्फपणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उतरलो होतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळाली आहे. त्याशिवाय या आंदोलनातील एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याची महत्त्वाची मागणी होती. सध्या विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टासमोर आहे. आंदोलनातील पहिल्या टप्प्यात मिळालेले यश मोठे असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलनात उतरलो होतो, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. एसटी संप आम्ही चिघळवला असल्याचा आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला न्याय देण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत होतो असेही पडळकर यांनी म्हटले.