Nagpur ACB Update : लाच घेणाऱ्यांचे आणि लाच देणाऱ्यांचे अनेक प्रकार आजवर आपण पाहिले आहे ऐकले आहेत. आजवर लाखो रुपयांची लाच मागणारे तुम्ही पाहिले असतील, मात्र अवघे सत्तर रुपयांची लाच मागणारा एक महाभाग अँटी करप्शन ब्युरोच्या हाती लागला आहे. या महाभागाने उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी विद्यार्थिनीकडे 70 रुपयांची लाच मागितली होती.   

Continues below advertisement


नागपूर शहर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रावर हा प्रकार समोर आला आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करणारा पवन बिनेकर याला एसीबीनं ताब्यात घेतलं आहे.  या महाभागाने सरकारी विभागांची इभ्रतच काढली आहे. कारण त्याने हजारो आणि लाखो रूपयांची लाच घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विक्रम अवघ्या 70 रुपयांची लाच घेऊन भंग केला आहे, असं बोललं जात आहे.  



नागपूर शहर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या पवननं एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीकडून उत्पन्नाचा दाखल देण्यासाठी 70 रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी त्याला ही लाच स्विकारताना रंगेहात अटक केली.
 
जिच्याकडून लाच मागितली गेली ती मुलगी बारावीत शिकते. तिच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा दाखला हवा होता. त्यासाठी तिने वडिलांसह जाऊन तहसील कार्यालयात अर्ज केला. मात्र, तिला उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही. त्यांनी पवनकडे विचारणा केली असता दाखला देण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे 70 रुपयांच्या लाचेची मागणी केली.



त्यानंतर तक्रारदराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने सापळा रचत आरोपीला अटक केली. शंभर रुपयांच्या आतील लाच घेतल्याच्या प्रकरणी गेल्या अनेक वर्षातील ही एसीबीची ही एकमेव कारवाई असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, लाचेची ही रक्कम कमी असली, तरी राज्यात रोज हजारो नागरिक उत्पन्नाचा दाखल काढतात. त्यामुळे या माध्यमातून गरजू नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत आहे या प्रकरणातून समोर येत आहे.