Nawab Malik on Wankhede family : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची समीर वानखेडे आणि त्यांच्या परिवारावर सुरु असलेली आरोपांची मालिका आता काही काळापुरती स्थगित होणार आहे. हायकोर्टातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही, अशी हमी नवाब मलिकांनी हायकोर्टात दिली आहे. यामुळं अखेर वानखेडे कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 


एकलपीठाच्या निर्णयाला वानखेडेंकडून खंडपीठापुढे आव्हान देण्यात आले होते. आता या प्रकरणी 9 डिसेंबरला हायकोर्टात पुढील सुनावणी आहे.  मलिक यांनी याबाबत कुठेही  तक्रार का केली नाही?,  केवळ ट्विट करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात?  का हे सारं निव्वळ प्रसिद्धीपोटी? की मीडिया ट्रायलसाठी?  अशा सवालांची सरबत्ती न्यायमूर्ती एस. काथावालांकडून मलिकांच्या वकिलांवर यावेळी करण्यात आली. 


सकाळच्या ट्वीटमध्ये वानखेडेंवर पुन्हा केले होते आरोप
समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिकांनी ट्वीटरवर केला होता. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.  समीर वानखेडेचे गैरप्रकार मी गेले ५५ दिवस उघड करत आहे.  वानखेडे कुटुंबीयाची ओळखच दुहेरी असल्याचे मलिक यांनी म्हटले. वानखेडे कुटुंबीय वैयक्तिक जीवनात मुस्लिम राहिले. मात्र, अनुसूचित जातीचे फायदे मिळवण्यासाठी प्रमाणपत्रांवर हिंदू राहिले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. 


अंतिम संस्कारासाठी मुसलमान आणि सरकारी दस्तावेजासाठी हिंदू?


नवाब मलिकांनी यांनी सकाळी दोन ट्वीट केले. त्यातील दुसऱ्या ट्वीटमध्ये मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांवर आणखी एक आरोप केला.  मलिक यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले की, "आणखी एक फर्जीवाडा...अंतिम संस्कार करताना मुस्लिम आणि सरकारी दस्तावेजांसाठी हिंदू? धन्य आहेत दाऊद ज्ञानदेव." असे म्हटले. हा दावा करताना नवाब मलिकांनी काही कागदपत्रांचे फोटोही ट्वीट केले आहेत. 






मुंबई महापालिकेच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या नोंदीत समीर वानखेडे यांच्या आई जायदा ज्ञानदेव वानखेडे यांची नोंद हिंदू असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. महापालिकेच्या नोंदणीनुसार, मृत्यू नोंदणीनुसार जायदा यांचा मृत्यू 16 एप्रिल 2015 रोजी झाल्याची नोंद आहे. यामध्ये त्यांच्या धर्माची नोंद मुस्लिम अशी करण्यात आली आहे.  तर मृत्यू अहवाल  17 एप्रिल 2015 रोजीचा आहे. यामध्ये जायदा वानखेडे यांची हिंदु असल्याची नोंद करण्यात आली आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.