Mumbai Helmet For Pillion Riders : मुंबईकर बाईक चालकांना आजपासून हेल्मेट घालावंच लागणार आहे. ते ही केवळ बाईक चालकाला नव्हे तर मागे बसलेल्या व्यक्तिलाही. आजपासून मुंबईत बाईकवरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणं बंधनकारक आहे, नाहीतर मुंबई वाहतूक पोलीस तुम्हाला दंड करायला तयार आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी याबाबत नोटीस जारी केली होती. त्यानुसार आज 9 जूनपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम सुरु करण्यात येणार आहे.


वाहतूक अधिकारी आजपासून प्रत्येक जंक्शन आणि रस्त्यावर मोटारसायकलवर हेल्मेटशिवाय बसणाऱ्या दोघांवर कारवाई करणार आहेत. त्यामुळे आता मोटरसायकलवर बसणाऱ्या दोघांसाठी हेल्मेट सक्तीचे झाले आहे. ई-चलानद्वारेही दंड आकारला जाणार आहे. तसंच हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यासाठी सुमारे 50 वाहतूक पोलीस चौक्या सतर्क राहणार आहेत..


Helmet For Pillion Riders : मुंबईत टूव्हीलरवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती; पंधरा दिवसांनंतर होणार दंड आकारणी


आर्थिक राजधानी मुंबईत मोटारसायकल आणि स्कूटरवर मागे बसणाऱ्या व्यक्तींनाही हेल्मेट परिधान करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वाहतूक पोलिसांनी 25 मे रोजी हा आदेश जारी केला होता. अनिवार्य असूनही बहुतांश दुचाकी चालक हेल्मेट घालत नाहीत. हेल्मेट न घातल्याने रस्ते अपघातात जखमी आणि मृतांची संख्या वाढली आहे, असं अधिसूचनेत पोलिसांनी म्हटलं आहे. 


नवीन नियम लागू करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी 15 दिवसांची मुदत दिली होती. यानंतर नियमांचं उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसंच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. हेल्मेट घालणे दुचाकी चालक आणि त्याच्यामागे बसणाऱ्यांच्या हिताचं असल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे.  पगडी परिधान करणाऱ्या शीखांना हेल्मेटच्या अनिवार्यतेतून सूट देण्यात आली आहे.


दरम्यान, देशातील अनेक शहरांमध्ये दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्यासाठी हेल्मेट अनिवार्य आहे. अनेक ठिकाणी तर पाच वर्षांवरील मुलांसाठीही हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे.


ही कागदपत्रे ठेवावीत
दुचाकीस्वारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), इन्शुरन्स सर्टिफिकेट इन्शुरन्स सर्टिफिकेट आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. डीएल आणि प्रदूषण प्रमाणपत्र मूळ असावे. आरसी आणि विमा प्रमाणपत्राची छायाप्रत ठेवावी लागेल.