Mumbai Bandra Building Collapsed : मुंबईतील (Mumbai) वांद्रे (Bandra) परिसरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास एक तीन मजली इमारत कोसळली. या घटनेत एकाच मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वांद्रे येथील शास्त्रीनगर (Shastri Nagar) परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथक, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, पोलीस, 1 रुग्णवाहिका आणि महापालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आलं. 



सदर घटनेबाबत अधिक माहिती देताना डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितलं की, "मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास वांद्रे येथील शास्त्रीनगर भागांत तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून, पहिल्या मजल्यावर 6 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या मजल्यावरील 17 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या 17 जणांपैकी घटनेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर इतर 16 लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 23 जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र बचावकार्य अद्याप सुरुच आहे. अजुनही काही लोक मलब्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे."



वांद्रे येथील शास्त्रीनगर भागात उत्तर प्रदेश, बिहारमधून कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेल्या मजुरांची मोठी वस्ती आहे. दोन दिवसांपूर्वीच तीन मजली इमारतीच्या शेजारी बांधलेलं घर तोडण्यात आलं असून, या तीन मजली इमारतीचा आधार काढल्यानं ते कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याची माहिती डीसीपींनी दिली. 


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कामासाठी कुठेतरी जात असताना त्याच्या डोळ्यांसमोर इमारत कोसळली. त्यानं घटनेचं गांभीर्य ओळखून इतरांच्या मदतीनं तात्काळ बचावकार्य सुरु केलं. मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला. मात्र, या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तसेच, अजुनही मलब्याखाली काही लोक अडकल्याची भितीही त्यानं व्यक्त केली. स्थानिकांनी सांगितलं की, 2 दिवसांपूर्वी बिल्डरनं या इमारतीला लागून असलेलं घर पाडलं होतं. त्यामुळे या इमारतीचा आधार काढल्यामुळं ही इमारत कोसळली.