Heat Wave : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात झालेली वाढ ही  विकेंडपासून तीन दिवस कायम राहणार आहे.  तापमान  37 ते 38 अंशांवर जाणार असून, शनिवार, रविवार आणि सोमवारी उकाडा आणखी वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आले आहे. 


गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईत  उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. आणखी दोन दिवस मुंबई, ठाणे,पालघर, रायगडमध्ये  उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात  वाढत्या तापमानामुळे  अंगाची लाहीलाही  होण्याची चिन्हं आहेत. कारण पुढील दोन दिवसांत मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, शुक्रवारपासून  पारा वाढण्यास सुरुवात होईल.  शनिवार, रविवार  पारा चढा असणार आहे. 26, 27, 28  एप्रिलला मुंबईसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचा पारा चढणार आहे. 






आठवड्याच्या शेवटी मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. दुपारी 12  ते सायंकाळी 4  या वेळेत घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांकडूनही करण्यात येत आहे. भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही नागरिकांना दिला जात आहे.


उष्णतेची लाटेचे निकष कोणते?


कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त असणे यालाच उष्णतेची लाट येणं म्हटलं जातं.  अशा उच्च तापमानामुळे निर्माण होणारी परिस्थिती आणि अति आर्द्रतेमुळे लोकांच्या शरीरावर हानिकारक परिणाम होतो, यामुळे मृत्यू देखील होतो. 






भरपूर पाणी प्या 


उष्णतेची लाट आल्याने लहान मुलं, वृद्धांसह आधीच आजारी असलेल्यांनी सावध राहण्याची गरज आहे. यामुळे शरीरात पेटके येणे, थकवा येणे, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राहणार आहे.   


हे ही वाचा :


उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा