मुंबई : न्यायाधीश आणि न्यायालयातील अधिकाऱ्यांनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखायलाच हवी, त्यांनी असं कोणतंही कृत्य करु नये, ज्यानं न्यायपालिकेच्या प्रतिमेवर परिणाम होईल, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) राज्यातील न्यायाधीशांना बजावलं आहे. एका मद्यपी कनिष्ठ नगर दिवाणी न्यायाधीशाला कामावरून काढण्याच्या आदेशावर  शिक्कामोर्तब करताना हायकोर्टानं ही गंभीर समज दिली आहे.


काय आहे प्रकरण?


अनिरुद्ध पाठक या कनिष्ठ नगर दिवाणी न्यायाधीशावर अशोभनीय वर्तन आणि अन्य काही आरोप ठेवण्यात आले होते. नंदूबार प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी तसा अहवालच दिला होता. त्याची गंभीर दखल घेत विधी आणि न्याय विभागानं त्यांना कर्तव्यावरून काढण्याचे आदेश जारी केले. त्याविरोधात पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जेन यांच्या खंडपीठानं पाठक यांची याचिका फेटाळून लावत विधी आणि न्याय विभागाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासारखा कोणताच मुद्दा नाही, असं स्पष्ट केलं.


कोर्टाचा निर्णय काय?


गैरवर्तनाच्या शिक्षेत हस्तक्षेप होणार नाही. न्यायाधीशाला अशोभनीय वर्तनामुळे शिक्षा झाली असल्यानं त्याला दिलासा देता येणार नाही. मात्र बाजू मांडण्याची संधी न देताच न्यायाधीशाचं निलंबन झालं असेल किंवा नियमांना बगल देऊन न्यायाधीशाच्या नोकरीवर गदा आणली जात असेल, तर अशा प्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करु शकेल, असं हायकोर्टानं यावेळी स्पष्ट केलं.


कनिष्ठ नगर दिवाणी न्यायाधीश पाठक यांच्याविरोधातील तक्रारींची शहानिशा करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश शहाडा न्यायालयात गेले होते. जिल्हा न्यायाधीश सकाळी सव्वा दहा वाजल्यापासून संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत कोर्टात हजर होते. न्यायाधीश पाठक हे सव्वा अकरा वाजता कोर्टात आले. त्यांच्या बोर्डावर 70 फौजदारी प्रकरणं सुनावणीसाठी होती. वकीलांशी कोणतीही सल्लामसलत न करता न्यायाधीश पाठक यांनी सर्व सुनावण्या तहकूब केल्या. आणि ते न्यायालयाच्या आवारातच फिरत होते. या सर्व बाबी जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या चौकशी अहवालात नमूद केल्या.


उत्तन येथील महाराष्ट्र न्यायिक अकादमीच्या एका कार्यक्रमाचं पाठक यांना निमंत्रण होतं. या कार्यक्रमात त्यांना धड चालताही येत नव्हतं. अकादमीच्या संचालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही पाठक यांना देता आली नाही. नशेच्या अंमलीखाली असलेल्या पाठक यांना तिथून माघारी पाठवण्यात आल्याचं पत्र संचालकांनी जारी केलं होतं. त्यावेळी आपल्या गाडीला अपघात झाल्यानं स्ट्राँग औषधांचा शरीरावर परिणाम होता, असा दावा नंतर पाठक यांनी केला. तसेच तिथं आपली कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असा दावा पाठक यांनी केला होता.