मुंबई : गोव्यात जाऊन पार्टी करण्यासाठी मुंबईत एटीएममध्ये चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील वनराई भागात एटीएममधून 28 लाखांची चोरी या चोरट्यांनी केली होती. पार्टी करण्यासाठीच आरोपी चोऱ्या करत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबईत चोरी केल्यानंतर आरोपींनी गोव्याला जाऊन मित्रांसोबत पार्टी केली. मात्र ते फार काळ पोलिसांपासून पळ काढू शकले नाहीत. एटीएममधून पैसे लुटणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी मुंबई आणि सिंधुदुर्गातून बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी रितेश बर्गे आणि जगदीश पटेल हे दोघं एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीत काम करत होते. तर एक जण ओला कंपनीसाठी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. मात्र आता मौजमजेसाठी त्यांनी चोरीचा मार्ग निवडला.

13 मार्चच्या रात्री जोगेश्वरीतल्या एसआरपीएफ कॅम्पबाहेर असलेल्या एसबीआयच्या एटीएममधून आरोपींनी 28 लाख 66 हजार 250 रुपये चोरले. त्यापैकी सहा लाख रुपये गोव्यात पार्टी करण्यासाठी उडवले.