मुंबई : मॅकडोनल्ड्स चेन रेस्टॉरंटच्या 60 हून अधिक शाखांमध्ये विकल्या जाणाऱ्या कोकाकोला झिरो ड्रिंकवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध विभागाने ही नोटीस बजावली आहे.


कोकाकोला झिरो ड्रिंकमध्ये 'एसपार्टेम' हा आर्टिफिशियल स्वीटनर (कृत्रिमरित्या गोडवा आणणारा पदार्थ) चा समावेश असतो. हे घटक ग्राहकांसाठी अपायकारक आहेत. त्यामुळे ग्राहकांना ज्या डिस्पोजेबल ग्लासमधून हे पेय दिलं जातं, त्यावर वैधानिक इशारा छापून हे पेय विकणं अपेक्षित असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

एफडीएच्या अधिनियम 2011 नुसार कॅफिन असलेल्या खाद्य किंवा पेय पदार्थांच्या बॉक्स, बॉटल किंवा कंटेनरवर त्याबाबत वैधानिक इशारा देणं अनिवार्य आहे. मात्र मॅकडॉनल्ड्स रेस्टॉरंटकडून या नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप अन्न आणि
औषध विभागाने केला आहे.

'एसपार्टेम' हा आर्टिफिशियल स्वीटनर लहान मुलं आणि गर्भवतींसाठी अपायकारक आहे. साखरेच्या तुलनेत हा 200 पटींनी गोड असल्यामुळे लहान मुलांच्या तब्येतीला हानीकारक ठरु शकतो. मॅकडोनल्ड्सप्रमाणेच अशा वैधानिक इशाऱ्याविना पदार्थांची (विशेषतः कोकाकोला झिरो) विक्री करणाऱ्या सर्व रेस्टॉरंटना ही नोटीस बजावण्यात आली आहे.