मुंबई : पुढच्या महिन्यात एखाद्या तारखेला कोणता वार येतो, हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण लगेच कॅलेंडर शोधतो. किंवा दोन अंकी आकड्यांची बेरीज वजाबाकी करायची असेल, तरीही आपल्याला लगेच कॅलक्युलेटर लागतो.  मात्र ही सगळी आकडेमोड चुटकीसरशी करणाऱ्या मुंबईतील एका जिनियस चिमुरड्याने आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


लॅपटॉपवर सुपरफास्ट टायपिंग करत अब्जावधींची गणितं सोडवणारा जीनांश देढिया. वय अवघं 6 वर्ष... साध्या बोटांवर बेरीज करतानाही जिथे भल्याभल्यांच्या तोंडाला फेस येतो, तिथे हा चिमुकला कॅलक्युलेटरलाही मागे टाकतो. सहा वर्षांच्या जीनांशच्या विक्रमांचा डंका जगभर वाजत आहे.

तुम्ही कोणतीही तारीख सांगा... जीनांश तुम्हाला तब्बल 500 वर्षांच्या कॅलेंडरची इत्यंभूत माहिती देतो. त्यामुळेच तुर्कीमध्ये पार पडलेल्या मेंटल कॅलक्युलेशन स्पर्धेत त्यानं 32 वर्षीय व्यक्तीचा रेकॉर्ड ब्रेक केला.

जीनांशच्या बोटांच्या वेगापेक्षा त्याच्या बुद्धीचा वेग अधिक आहे. अबॅकस असो, क्युब असो की 500 वर्षांचं कॅलेंडर...
जीनांशला सगळंच अगदी तोंडपाठ आहे...

मुलांना शिक्षणासोबतच अभ्यासाला पूरक असणारं असं प्रशिक्षण दिलं तर मुलं त्यामध्ये रमतात आणि त्यांचं शिक्षण रटाळ न होता आनंददायी होतं. बुद्धी प्रत्येकाला असते, गरज आहे ती फक्त प्रशिक्षणाची... मग आपण आपल्याही घरात असाच जीनांश घडवू शकतो.