मुंबई : मुंबईच्या महापौरांच्या मनात असलेल्या मलबार हिलमधील बंगल्याचा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय या बंगल्यात राहत असल्यामुळे विश्वनाथ महाडेश्वरांच्या राहण्याची सोय कुठे होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.


मुंबईच्या महापौरांचं शिवाजी पार्कमधील सध्याचं निवासस्थान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मलबार हिल येथील जलविभागाचा बंगला देण्यात यावा, अशी शिवसेना आणि खुद्द महापौरांचीही इच्छा आहे.

सध्या मलबार हिलमधील बंगल्यात मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिव प्रवीण दराडे राहतात. प्रविण दराडेंना या आधीही महापालिकेनं बंगला रिकामा करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र आता सामान्य प्रशासन विभागानं प्रविण दराडेंची पाठराखण करत या बंगल्यासाठी दराडेंना कोणतीही नोटीस देण्यात येऊ नये, असं पत्र दिलं आहे.

एकीकडे हा बंगला महापौरांना मिळावा अशी पालिकेची मागणी आहे, तर दुसरीकडे बंगला प्रविण दराडेंच्याच ताब्यात राहील अशी तंबीच सामान्य प्रशासनानं पालिकेला दिली आहे.

यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी आक्रमक भूमिका घेत पालिका आयुक्तांनी ही नोटीस आपल्यापासून दडवून ठेवल्याचं म्हटलं आहे. तसंच राज्य सरकारला पालिकेच्या बंगल्याबाबत दखल देण्याचा अधिकार काय? असा सवालही केला आहे.