मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते यांनी माझ्यावर केलेले आरोप हे पूर्णत: निराधार आहेत. माझ्या मतदारसंघातील माझे विरोधक हेमंत देशमुख यांच्या माहिती व सांगण्यावरुन माझ्यावर हे तथ्यहीन आरोप करण्यात येत आहेत.’ असं म्हणत पयर्टनमंत्री जयकुमार रावल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.


‘तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीशी माझा संबंध नाही'

‘तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही. या कंपनीशी व्यक्तिश: माझा भूतकाळात आणि वर्तमानातदेखील संबंध नव्हता आणि नाही. मी या कंपनीत ना कधी संचालक होतो वा आहे, ना कधी भागधारक होतो वा आहे. तसेच या रिसॉर्टसंदर्भात माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणतीही क्रिया–प्रक्रिया झालेली नाही. तरीही या संदर्भात माझ्यावर आरोप करण्यात आले असून ते पूर्णत: तथ्यहीन आणि खोटे आहेत. विरोधकांनी आरोप करताना ते पुरावे व कागदपत्रांनिशी करावेत.’ असंही ते यावेळी म्हणाले.

‘यासंदर्भात माहिती घेतली असता, साधारण १९५७-६० च्या काळात तोरणमाळ येथे कुडाच्या झोपड्याच होत्या. १९९० – ९१ च्या काळात एमटीडीसीने रितसर प्रकिया करुन तोरणमाळ रिसॉर्ट हे तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीस भाडेतत्वावर चालविण्यास दिले व बरीच वर्षे त्यांनी नियमितपणे भाडेदेखील भरले. तेव्हा मी शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थी होतो. जे. जे. रावल हे त्यावेळी या भागीदार कंपनीचे संचालक होते. तथापी, सन २००० मध्ये त्यांनीही या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या कंपनीच्या कामकाजाशी तब्बल १८ वर्षांपासून त्यांचाही काही संबंध राहिला नाही.’ असं म्हणत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले.

‘रावल परिवाराचा कुणीही सदस्य या कंपनीचा संचालक नाही. सन २००० पासून श्री. राजेश रेशमवाला हे ही कंपनी चालवत आहेत. या पूर्ण कालावधीत मी व्यक्तिश: कधीही कंपनीचा संचालक किंवा भागधारक नव्हतो. तसेच या रिसॉर्टसंदर्भात माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणतीही क्रिया – प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे सदर रिसॉर्ट बेकायदेशीर हडपल्याचा वा मंत्रीपदाचा दुरुपयोग केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ असा दावा त्यांनी केला.

जयकुमार रावल यांचे हेमंत देशमुखांवर भ्रष्टाचारचे आरोप 

दरम्यान, यावेळी रावल यांनी हेमंत देशमुख यांनीच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.

  • द्वारकाधीश उपसा जलसिंचन योजना, विखरण

  • धुळे जिल्हा सहकारी बँक

  • शिंदखेडा सहकारी साखर कारखाना

  • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ


‘आदी विविध प्रकरणांमध्ये त्यांच्याविरुद्ध घोटाळ्याच्या केसेस सुरु आहेत. त्यामुळे हेमंत देशमुख यांच्याविरोधात एसीबीच्या दोन प्रकरणात चौकशी सुरु आहेत.’ असंही रावल यावेळी म्हणाले.

‘विरोधकांनी Media Trial करण्याऐवजी योग्य त्या फोरमवर तक्रार करावी’

‘मी ज्यांचा दोन वेळा निवडणुकीत पराभव केला ते हेमंत देशमुख यांचे स्वत:चे हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. हेमंत देशमुख यांच्याविरोधात एसीबीच्या २ चौकशी अंतिम टप्प्यात आहे. अशा भ्रष्टाचारात बरबटलेल्या व्यक्तींच्या माहितीच्या आधारे राजकीय द्वेषातून माझ्यावर निराधार आरोप करण्यात येत आहेत. त्यांना त्यांच्या आरोपात तथ्य वाटत असेल तर त्यांनी वैधानिक मार्ग अवलंबावा माध्यमांसमोर तथ्यहीन आणि अर्धसत्य माहिती देऊन संभ्रम निर्माण केला जात आहे. विरोधकांनी Media Trial करण्याऐवजी योग्य त्या फोरमवर जाऊन तक्रार करावी, कायदा आपली योग्य भूमिका निभावेल.’

काय आहे प्रकरण ?

जयकुमार रावल संचालक असलेल्या तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीने नंदूरबार येथील एमटीडीसीचे रिसॉर्ट  15 वर्षांसाठी दरमहा 15 हजार रुपये भाडेतत्त्वावर चालवायला घेतलं. त्यानंतर पुन्हा भाडेकरार वाढवून तो 2006 पर्यंत करण्यात आला. 2006 पर्यंत या कंपनीने एमटीडीसीला भाडेच भरले नाही. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीला नोटीस पाठवून थकलेले भाडे व्याजासह भरण्याबरोबरच रिसॉर्ट खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. मात्र, कंपनीने या नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

एमटीडीसीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कंपनीविरोधात याचिका दाखल केली. ‘आम्ही रिसॉर्ट दुरुस्तीवर 60 लाख रुपये खर्च केल्याचा दावा करत त्या रकमेची मागणी कंपनीने एमटीडीसीकडे केली. मात्र, कोर्टाने कंपनीला भाडे भरुन रिसॉर्टचा ताबा सोडण्याचे आदेश दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांची मागणी :

यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमीन खरेदी प्रकरणात आरोप झाल्यानंतर रावल यांच्यावर राष्ट्रवादीने हा दुसरा निशाणा साधला आहे. हे प्रकरण गंभीर असून रावल यांची मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यापूर्वी जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांनी रावल यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे.

संबंधित बातम्या :

MTDCचा रिसॉर्ट बेकायदेशीररित्या रावलांच्या ताब्यात : नवाब मलिक