मुंबई : गँगस्टर छोटा राजनचा भाऊ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाच्या आमिषाने निकाळजेने बलात्कार केल्याचा आरोप 22 वर्षीय युवतीने केला आहे.


आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत, तसंच शिक्षणाचा खर्च करु, असं सांगून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन निकाळजेने बलात्कार केला, असा आरोप नवी मुंबईतील घणसोली भागात राहणाऱ्या एक युवतीने केला. टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नवी मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग केलं आहे.

युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये ती कुर्ला येथे आपल्या मामाकडे आली असताना दीपक निकाळजेची तिच्यावर नजर पडली. तिच्या कुटुंबासोबत लगट करुन, तिला पैसे आणि लग्नाचं आमिष निकाळजेने दाखवलं. कर्जत येथील एका फार्म हाऊसवर आपल्या ऑडी कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असाही आरोप आहे.

या मुलीने लग्नाची मागणी केली असता तिला मारहाण सुद्धा करण्यात आली. पोलीस तक्रार करु नये म्हणून दीपक निकाळजेची बहीण आणि मेहुण्याने दबाव आणल्याचा आरोपही तक्रारदार युवतीने केला आहे.

तरुणीने टिळकनगर पोलिसात 18 मार्चला तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जिथे हा प्रकार घडला त्या नवी मुंबईतील परिमंडळ 2 कडे वर्ग केला आहे, अशी माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे यांनी दिली.