मुंबई : अंगणवाडी सेविकांसाठी महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने दिलासादायक बातमी दिली आहे. अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं वय 65 वर्षे करण्यात आलं असून त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात दीड हजार रुपयांची वाढ दिली जाणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली.


अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं वय 65 वर्ष कायम ठेवण्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली. 5 ऑक्टोबर 2017 रोजी अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं 60 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र तो आता मागे घेण्यात आला.

ज्या अंगणवाडी सेविकांची दहा वर्ष सेवा झाली आहे, त्यांना 6 हजार 500 रुपये मानधन मिळेल, तर 10 ते 20 वर्षांच्या सेवेसाठी 6 हजार 695 रुपये, 20 ते 30 वर्षांच्या सेवेसाठी 6 हजार 760 रुपये आणि 30 वर्षांहून अधिक वर्षे सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविकांना 6 हजार 825 रुपये इतके मानधन मिळणार आहे.

आजच्या बैठकीत मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली असून, त्यानुसार 10 वर्षांपर्यंत सेवा देणाऱ्या सेविकांना 4 हजार 500 रुपये, 10 ते 20 वर्षे सेवा दिलेल्या सेविकांना 4 हजार 635 रुपये, 20 ते 30 वर्षे सेवा देणाऱ्या सेविकांना 4 हजार 680 रुपये आणि 30 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिलेल्या सेविकांना 4 हजार 725 रुपये इतके मानधन मिळणार आहे.

याबरोबरच मदतनीसांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार 10 वर्षे सेवा देणाऱ्या मदतनीसांना 3 हजार 500 रुपये, 10 ते 20 वर्षे सेवा देणाऱ्या मदतनीसांना 3 हजार 605 रुपये, 20 ते 30 वर्षे सेवा देणाऱ्या मदतनीसांना 3 हजार 540 रुपये आणि 30 वर्षांपेक्षा अधिक सेवा देणाऱ्या मदतनीसांना 3 हजार 675 रुपये इतके मानधन मिळेल.