मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकावर तुम्ही लिंबू सरबत पीत असाल तर काळजी घ्या. इथे लिंबू सरबत किती गलिच्छ पद्धतीने तयार केलं जातं, हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कुर्ला रेल्वे स्थानकावरील हा स्टॉल असून तो रेल्वे प्रशासनाने सील केला आहे.


उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने अनेक प्रवासी स्टेशनवरील थंडगार लिंबू सरबत पितात. मात्र कुर्ल्यात हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 वर असलेल्या खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचं समोर आलं.

या स्टॉलच्या छतावर कामगार लिंबू सरबत बनवत होता. यानंतर त्याने सरबतामध्येच हात धुतले. कुर्ला रेल्वे स्थानकावरील पुलाचे पत्रे काढल्याने एका प्रवाशाच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याची रेल्वेकडे तक्रारही केली. तसंच सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला.

या प्रकाराची माहिती स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांना मिळाली. त्यांनी शिवसैनिकांसह तिथे जाऊन स्टॉल चालवणाऱ्यास जाब विचारला आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. शिवसैनिकांनी या स्टॉलसह मुंबईतही वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर ठेक्याने घेतलेला स्टॉलही बंद करण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली. रेल्वे प्रशासनाने ताबडतोब या ठेकेदाराचा हा स्टॉल बंद केला आणि त्या कामगारावरही गुन्हा दाखल केला.

त्यामुळे यापुढे रेल्वे किंवा प्लॅटफॉर्म मिळणारे अन्नपदार्थ विचार करुनच खरेदी करा, नाहीतर आरोग्य धोक्यात येईल.