मुंबई :  मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील एका इमारतीला भीषण आग लागली. नेहरू रोड येथील न्यू पूनम बाग इमारतीला मोठी आग लागली. या आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. 


न्यू पूनम बाग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्यात. तब्बल एक ते दीड तासानंतर अग्निशमन दलाचा जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. सध्या फायर कूलिंगचे काम सुरू आहे. या भीषण आगीत फ्लॅट क्रमांक 201 मधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, लाकडी फर्निचर, लाकडी दरवाजे, फॉल्स सिलिंग, घरगुती वस्तू जळून खाक झाल्यात. आगीचे नेमकं कारण समजले नाही. सुदैवाने ही आग इमारतीमधील इतर ठिकाणी पसरली नाही. 


96 वर्षीय वृद्धेचा मृत्यू 


या आगीत भाजून 96 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. हर्षदा बेन पाठक असे महिलेचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना हर्षदा पाठक या घरात पडल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे. 


गोदामाला लागलेल्या आगीतून चिमुकल्याला वाचवायला आई गेली पण मायलेकांना काळानं गाठलं; भिवंडीतील घटना


गोदामाला लागलेल्या आगीतून (Fire) आपल्या तीन वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी आईने आगीत उडी घेतली. मात्र, मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आईला आणि तिच्या पोटच्या गोळ्याला काळानं गाठलं असल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कामगार वर्गात शोककळा पसरली आहे. 7 नोव्हेंबर 2023 रोजी ही घटना घडली. 


भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाऊंड येथील पहिल्या मजल्यावरील टेक्सराईज कापसापासून उशी बनवणारी शेजल एंटरप्रायझेस हा कारखाना, गोदाम आहे. या गाळ्यास सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटने लागली. या आगीत काम करणारी महिला आणि तिच्यासोबत आलेला तीन वर्षीय चिमुकला होरपळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शकुंतला रवी राजभर  (वय 35) आणि प्रिन्स राजभर (वय 3) असे आगीत जळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.