मुंबई: महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्याआधीच आधीच राज्यात नाराजीचे ढोल वाजायला सुरुवात झाली आहे. मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचं खच्चीकरण होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केला आहे. तर सत्तेसाठी दुय्यम भूमिका घेणं काँग्रेससाठी धोकादायक असल्याचं मत मिलिंद देवरा यांनी व्यक्त केलं आहे. 


मंगळवारी महापालिका निवडणुकीकरता वॉर्ड आरक्षणांची सोडत जाहीर झाली आणि काँग्रेसच्या 29 नगरसेवकांपैकी तब्बल 21 नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षणात खालसा झालेत. मुंबईत वॉर्ड पुर्नरचना आणि वॉर्ड आरक्षण याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसल्याचं स्पष्ट झालंय. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मिलिंद देवरा आणि रवी राजा यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. या नव्या प्रभागरचनेवरून काँग्रेस आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. 


नाना पटोले म्हणाले की, मिलिंद देवरा यांनी जे मत मांडलय तेच मत मी देखील आधी मांडलय. जिथे चुकीची प्रभाग रचना झालीय तिथे आमचा विरोध राहिल. त्याचबरोबर कॉंग्रेसमधे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. 


मुंबईत काँग्रेसचे गेल्या निवडणूकीत 29 नगरसेवक निवडून आले आहेत. वॉर्ड पुर्ननरचनेमुळे 29 पैकी 21 नगरसेवकांच्या जागा धोक्यात आल्यात. यामध्ये माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा, सुफियान वनु, कमरजहाँ सिद्दीकी, आसिफ झकेरियाचे वार्ड धोक्यात आलेत.


नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनानं वॉर्ड पुर्ननरचना आणि आरक्षणात फेरफार केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेस मुंबईतून कशी संपेल याकरताच ही खेळी असल्याचंही म्हटलं गेलं आणि काँग्रेसचा थेट निर्देश शिवसेनेकडेच आहे.


महाविकास आघाडीतील तीन पक्ष राज्याचा गाडा हाकत आहे. पण सरकार चालवताना बऱ्याचदा महाविकास आघाडी मधली बिघाडीही चव्हाट्यावर येते. यावर प्रश्न विचारला की भांड्याला भांडं लागणारच असं उत्तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून देण्यात येतं. त्यामुळे सध्यातरी सत्तेत असूनही काँग्रेसमधली अस्वस्थता लपली नाही. स्वतःच्या अस्तित्वासाठी काँग्रेसला लढावं लागतंय. पण आता काँग्रेसचा हाच लढा कोर्टाच्या पायरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 


सत्तेत असूनही एखादा पक्ष जर अस्तित्वाकरता झगडत असेल तर ती अस्वस्थता फार मोठी असते. काँग्रेसला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुनरुज्जीवन मिळाले तर पुन्हा महाराष्ट्रात पाय रोवून उभं राहायला नवं बळ मिळेल. पण, केवळ वॉर्ड रचना आणि आरक्षण यांमुळे ते जमलं नाही असाच आरोप काँग्रेस करत राहीली तर कृतीशून्यता हीच काँग्रेसला गर्तेत घेऊन जाणारी ठरेल.