मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज यांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. मोहित कंबोज यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या एका गुन्हात बुधवारी मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाची सध्या चौकशी करत आहे.


मोहित कंबोज यांच्या कंपनीने सास 2011 ते 2015 या कालावधीत सुमारे 52 कोटी रुपयांचे कर्ज बुडवलं असा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करता मोहित कंबोज यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. ती टाळण्यासाठी कंबोज यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती.


इंडियन ओव्हरसिज बँकेकडून कंबोज यांनी हे कर्ज घेतले होतं. मात्र ज्या कारणासाठी कर्ज घेतलंय त्यासाठी त्याचा वापर केला नाही आणि ते अन्यत्र वळविण्यात आले. तसेच ही रक्कम परतही करण्यात आलेली नाही, अशी तक्रार आल्यानं मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहित कंबोज आणि कंपनीच्या अन्य दोन संचालकांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र मोहित कंबोज यांनी या आरोपांचे खंडन करत हा राजकीय सूडबुद्धीचा खेळ असल्याचं स्पष्ट केलं आहे.