मुंबई : अर्धांगवायूचा त्रास होत असल्याने मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झालेल्या चिमुरड्याला डॉक्टरने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सहा वर्षीय सूर्यांशू गुप्ताच्या डोक्यात डॉक्टरने टॉर्च मारल्याचा प्रकार रविवारी घडला. त्यामुळे सूर्यांशूला तीन टाके पडले.

विक्रोळी येथे राहणाऱ्या मुकेशकुमार गुप्ता यांच्या मुलाचे हात-पाय अचानक थरथरु लागले. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णाला दाखल केल्यानंतर डोळे तपासताना डॉ. गौरव मौर्या याने टॉर्च मारल्याचं गुप्ता कुटुंबियांनी सांगितलं.

रविवारी रात्री बारा वाजल्यानंतर डोळे तपासण्यासाठी बोलवल्याचा राग काढत डॉक्टरने त्या चिमुरड्याच्या डोक्याला टॉर्चने मारल्याचा आरोप गुप्ता कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे जखम होऊन त्या मुलाला तीन टाके पडले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या संदर्भात चौकशी सुरु असून हॉस्पिटल प्रशासनानं कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. इतकंच नव्हे तर या घटनेची चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिसांना घटनेचं सीसीटीव्ही फूटेज मिळू शकलेलं नाही. तिथला कॅमेरा बंद असल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे.

ही घटना रुग्णालयाच्या अभ्यागत समितीचे सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गुरव यांनी सोमवारी उघडकीस आणली. एम.आर.ए मार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे, मात्र कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.