मुंबई : अंगावर झाडाची फांदी पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईत घडली आहे. सुखी लीलाजी असं मृत्यू महिलेचं नाव असून त्या 91 वर्षांच्या होत्या.

मुंबईतील वाळकेश्वर भागातील बाणगंगा तलावाजवळ सकाळी सहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

सुखी लीलाजी आज सकाळी वॉकसाठी बाणगंगा तलावाजवळ गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या अंगावर झाडाची फांदी कोसळली.

या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारांसाठी जी टी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तिथे त्यांना मृत घोषित केलं.

मागच्या महिन्यातच दादरमध्ये अंगावर झाड कोसळून एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी सहा महिन्यांपूर्वी चेंबूरमध्ये बस स्टॉपवर बसलेल्या महिलेचाही अशाच प्रकारे झाड अंगावर पडून मृत्यू झाला होता.

झाड पडून मृत्यू झालेल्या घटना

* 22 जुलै 2017 - दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू

* 23 जुलै 2017 - किशोर पवार (वकील)- ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरात झाड कोसळून मृत्यू

* 7 डिसेंबर 2017 - शारदा घोडेस्वार - डायमंड गार्डन परिसर, चेंबूरमध्ये बसस्टॉपवर झाड कोसळून मृत्यू

* 19 एप्रिल 2018 - दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू

* 29 मे 2018 - वाळकेश्वरमध्ये सुखी लीलाजी यांचा अंगावर झाडाची फांदी पडून मृत्यू

संबंधित बातम्या

मुंबई पालिकेच्या हलगर्जीमुळे दूरदर्शनच्या माजी निवेदिकेचा बळी?

ठाण्यात अंगावर झाड पडून वकिलाचा मृत्यू